अमरावती: यंदा कापसाला बाजारात गेल्‍या वर्षीपेक्षाही कमी दर मिळत असल्‍याने कापूस उत्‍पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. सध्‍या विदर्भातील बाजारात कापसाला सरासरी ६ हजार ८०० ते ७ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे.

दोन वर्षांपूर्वी कापसाला विदर्भात काही दिवस प्रतिक्विंटल १३ ते १४ हजार रुपयांचे दर मिळाले होते. मागील वर्षीही ९ हजार ७०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत भाव पोहोचले होते. नंतर मात्र कापूस अनेक दिवस प्रतिक्विंटल आठ, साडेआठ हजार रुपयांवर स्थिरावला होता.

सध्‍या कापसाची वेचणी सुरू झाली असून नवीन कापूस बाजारात आला आहे. मात्र बाजारात कापसाचे दर मागील वर्षीपेक्षा आताच प्रतिक्विंटल १२०० ते १५०० रुपयांनी कमी आहेत. सध्‍या अमरावती अकोल्‍याच्या खासगी बाजारात कापसाला प्रतिक्विंटल ७ हजार ३०० रुपये भाव आहे. कापूस खरेदीदारांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार आगामी पंधरा दिवसांत बाजारात कापसाची आवक वाढेल, त्यावेळी कापसाचे दर थोडे कमी होऊ शकतात. मागील वर्षी नवीन कापसाला प्रारंभी ९ हजार ७०० रुपयांपर्यंत दर मिळाला होता.

हेही वाचा… चंद्रपूर: फ्लाईंग क्लबसाठी उद्योगपतींकडून शिकावू विमाने घेण्याचा प्रस्ताव

गेल्‍या वर्षी सोयाबीन व कापसाला अपेक्षित भाव शेतकऱ्यांना मिळाला नसला तरी नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांची पसंती कापूस व सोयाबीन पिकालाच आहे. परंतु सोयाबीन पाठोपाठ कपाशीच्या पिकानेही माना टाकल्याने उत्पादनात निम्म्यापेक्षा जास्त घट होईल असे चित्र आहे.

कापसाचे लागवड क्षेत्राच्‍या बाबतीत विदर्भ अग्रेसर असला तरी उत्‍पादकतेत मात्र सर्वात पिछाडीवर आहे. नैसर्गिक आपत्‍तीमुळे या वर्षी या उत्पादकतेत अजून घट होण्याची शक्यता आहे. कापसाचा उत्पादन खर्च वाढत असताना एकरी जेमतेम तीन ते चार क्विंटल उत्पादनामुळे ही शेती प्रचंड तोट्याची ठरू लागली आहे. कोरडवाहू शेतीत बीटी कापसाची उत्पादकता खूपच कमी आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मजुरांची टंचाई

कापसाचे अवकाळी पावसामुळे सर्वत्र नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. त्यात अनेकांच्या कापसाची बोंडे उमलली होती. अशात पावसाने बोंडे काळवंडू लागली आहेत. कापूस वेचणी करून घेण्याची धावपळ शेतकरी करीत आहेत. परंतु मजूरटंचाईचा प्रश्‍न जाणवू लागला आहे.
सध्या प्रतिकिलो ८ ते १० रुपये दर यानुसार मजुरी द्यावी लागत आहे. कापूस ओला आहे, त्याचे वजन अधिक आहे. तो वाळवून वजन कमी होणार असून त्‍यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. परंतु शेतातच कापूस भिजत राहिल्यास हाती काहीच येणार नाही, अशी स्थिती आहे. अनेक शेतकरी निरभ्र वातावरणाच्‍या प्रतीक्षेत होते. सध्‍या असे वातावरण असल्‍याने एकाच वेळी अनेक शेतकऱ्यांनी कापूस वेचणी सुरू केली आहे. यामुळे मजूरटंचाई जाणवू लागली आहे.