वर्धा : खरीप हंगाम जोरात असतांनाच शेतकऱ्यांनी लावलेले बियाणे बोगस निघाले तर हाहाकार उडणारच. तशा लेखी तक्रारी झाल्या. पालकमंत्री डॉ. पंकज राजेश भोयर यांनी चौकशीचे आदेश दिलेत. कारण बहुतांश शेतकरी हे कर्ज काढून किंवा उधारीवर असेल तर मिळेल ती किंमत मोजून बियाणे घेतात. त्यावर फसगत झाली तर वर्षभर डोळ्यातून अश्रूच.
ही बाब सर्वप्रथम चव्हाट्यावर आणणारे आमदार राजेश बकाने यांनी भ्रष्ट बियांण्याची जंत्रीच सादर केली होती. नंतर विधानसभेत पहिल्याच आठवड्यात प्रश्न मांडला. आज लक्षवेधी लावली. त्यात त्यांनी वर्धाच नव्हे तर राज्यातील हजारो शेतकऱ्यांचे आयुष्य बोगस बियाणे लावल्या गेल्याने उध्वस्थ झाल्याचे निदर्शनास आणले. हैद्राबाद येथील काही बियाणे कंपन्यांनी सोयाबीनचे बोगस बियाणे सरसकट विकले. हे बियाणे शून्य उगवण क्षमतेचे आहे. हे बियाणे शेतीची हत्या व शेतकऱ्यांच्या आत्महत्येस प्रवृत्त करेल. त्यामुळे या कंपन्यावार फसवणूकीचा नव्हे तर थेट हत्येचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी संतप्त स्वरात त्यांनी मागणी केल्याचे दिसून आले.
आमदार बकाने यांनी बियाणे परीक्षक, नोंदणी अधिकारी, जिल्हा गुणवत्ता निरीक्षक, मंजुरी देणारे वरिष्ठ यांच्यावर विभागीय व फौजदारी कारवाई करण्याची मागणी केल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांना कणा मोडणारे हे गुन्हेगार आहेत. आता विधानसभेत तर पुढे दोषींना शिक्षा नं झाल्यास रस्त्यावर उतरू, असा ईशारा बकाने यांनी दिला. त्यावर कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी उत्तर देतांना स्पष्ट केले की संबंधित बियाणे कंपनीवर काळ्या यादीत त्यांना टाकण्याची कारवाई केल्या जाईल, असे स्पष्ट केले. तसेच केवळ कृषी अधीक्षकच नव्हे तर या बियाणे विषयाशी संबंधित राज्य शासनाच्या सर्व कृषी अधिकाऱ्यांवर येत्या १० दिवसात कठोर कारवाई करणार, अशी हमी कृषी राज्यमंत्री जयस्वाल यांनी दिल्याचे आमदार सांगतात.
आमदार बकाने यांनी बोगस बियाणे राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या मुळावर उठले असल्याचे स्पष्ट केले. म्हणून या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळावी. त्यासाठी विशेष मदत जाहीर करावी. तसेच ही रक्कम दोषी कंपन्यांकडून वसूल करावी, अशीही भूमिका मांडली आहे. यावेळी जर या आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळाली नाही, तर भीषण चित्र उमटेल, असा ईशारा देण्यात आला.