वर्धा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे लोकसभा निवडणुकीनंतर परत एकदा जिल्हा दौऱ्यावर येणार असल्याचे निश्चित झाले आहे. सोबत केंद्रीय मंत्री नितिन गडकरी पवार यांच्या सोबतीस राहणार आहे. एवढे कमी म्हणून की काय भाषणाच्या या मेजवानीत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व नेते अनिल देशमुख, शेकाप नेते जयंत पाटील व खासदार अमर काळे यांची पण हजेरी लागणार आहे.

निमित्त आहे ते माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्याचे. मे २०२३ ते मे २०२४ दरम्यान विविध कार्यक्रम घेत कृतज्ञता वर्ष साजरे करण्यात आले. त्याचा सांगता सोहळा १७ ऑगस्ट शनिवारला दुपारी २ वाजता यशवंत महाविद्यालयच्या प्रांगणात आयोजित आहे.

हेही वाचा : चंद्रपूर, ब्रम्हपुरी, वरोऱ्यावर शिंदे सेनेचा दावा

त्यास या मान्यवरांची हजेरी लागणार. अमृत महोत्सव समितीचे डॉ. विलास देशमुख व सतीश राऊत यांनी ही माहिती दिली. महोत्सवी कार्यक्रमाचा प्रारंभ अरुण गुजराती यांच्या उपस्थितीत झाला होता. खासदार शरद पवार हे १७ ऑगस्ट रोजी सकाळी नागपुरात पोहचतील. दुपारी कार्यक्रम आटोपून मुंबईस रवाना होणार असल्याचे संस्थाध्यक्ष समीर देशमुख यांनी नमूद केले.

इतर मान्यवर पण उपस्थित राहणार असल्याचे निश्चित झाले असल्याचे ते म्हणाले. अमृत महोत्सव समितीत ज्येष्ठ नेते दत्ता मेघे तसेच रामदास तडस, हर्षवर्धन देशमुख, गिरीश गांधी, राजेंद्र शिंगणे, सुभाष धोटे, संतोष कोरपे, अरविंद पोरेडडीवर, राजेंद्र जैन, प्रवीण देशमुख यांचा समावेश आहे.

हेही वाचा : यवतमाळच्या गुन्हेगारीचा दिल्लीत डंका!

प्रा. सुरेश देशमुख यांनी सहकार व शिक्षण क्षेत्रात केलेले कार्य तसेच जिल्ह्याच्या सांस्कृतिक, साहित्य, सामाजिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा आढावा घेणाऱ्या लोकनेता या गौरव अंकाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते होईल. गत वर्षभरात डॉ. अभय बंग यासह अन्य मान्यवरांची व्याख्याने, वृक्षारोपण, रक्तदान शिबीरे, स्काउट गाईड मेळावा, क्रीडा महोत्सव व अन्य कार्यक्रम संपन्न झाल्याची माहिती डॉ. विजय बोबडे व डॉ. प्रमोद नारायणे यांनी यावेळी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बड्या नेत्यांची एकाच वेळी लागणारी हजेरी ही कार्यक्रमाची उत्सुकता वाढविणारी ठरणार. काँग्रेस कडून वर्धा लोकसभा मतदारसंघ तसेच उमेदवार पा स्वतःकडे खेचून घेत पवारांनी विजयी पाऊल विदर्भात टाकले. आता पुढील काळात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याकडे पाहिले जात आहे.