वर्धा : भारतात डॉक्टर होणे शक्य नं झाल्यास अन्य पर्याय मग हताश पालक शोधतात. काही देशात भारतापेक्षा कमी पैश्यात डॉॅक्टर होण्याची सोय आहे. त्यात रशिया अग्रभागी. तेथील विविध विद्यापीठात आज भारतातील शेकडो विद्यार्थी एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. याच चक्करमध्ये एक सुशिक्षित परिवार सापडला. वर्धेलगत उमरी मेघे येथील डॉ. शुभम गवारले हे वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या काकाच्या मुलाला डॉक्टर व्हायचे होते. म्हणून विदेशी विद्यापीठाबाबत चौकशी सूरू झाली.

या चौकशीत गुजरात येथे पत्ता लागला. येथील यागनीक पटेल याने असा प्रवेश मिळवून देण्यासाठी ऑफिसच थाटले आहे. त्याने रशियातील विविध विद्यापीठात वैद्यकीय प्रवेश मिळवून दिल्याचे समजले. म्हणून मग त्याचा संपर्कक्रमांक शोधून बोलणे करण्यात आले. तेव्हा पटेलने तो रशियातील क्रासनोयार्क विद्यापीठाचा समन्वयक असल्याचे त्याने सांगितले. तुमची पण ऍडमिशन करून देवू शकतो. आता ४० मुलांचा गट तिथेच चालला आहे. तुम्हास ऍडमिशन हवी असेल तर २७ लाख रुपये लागतील, असे त्याने सांगितले. डॉ. गवारले यांनी ही माहिती त्यांचे काका मनोज राऊत यांना कळविली. हे पैसे मग जमविण्यात आले. सुरवातीस पिंपळखुटा येथील बँकेतून तसेच फोन पे मार्फत ३ लाख ८३ हजार रुपये या पटेलला पाठविण्यात आले. त्यांना प्रवेश पत्र सुद्धा पटेलने पाठविले. पुढे डॉ. गवारले यांनी सदर विद्यापीठाशी संपर्क केला आणि त्यांची झोपच उडाली. त्यांनी ई मेल माध्यमातून संपर्क केल्यावर तुमचे प्रवेशपत्र बनावट असल्याचे उत्तर विद्यापीठाकडून आले. तेव्हा फसवणूक झाल्याचा प्रकार स्पष्ट झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर आणखी चौकशी करण्यात आली. तेव्हा या विद्यापीठात समन्वयक असल्याचे सांगणाऱ्या पटेल याने त्या विद्यापीठात काही विद्यार्थ्यांचे पैसेच भरले नव्हते. म्हणून विद्यापीठाने या पटेलकडून ऍडमिशन घेणेच बंद केले असल्याची माहिती पुढे आली. स्वतः डॉ. गवारले यांचेही शिक्षण विदेशी विद्यापीठातून झालेले आहे. म्हणून त्यांच्या मार्फत ऍडमिशन करण्याचा प्रयत्न झाला. पण यावेळी मात्र फसवणूक झाली. भारतात शक्य नाही म्हणून आपल्या पाल्यास देशाबाहेरील विद्यापीठात शिकण्यास पाठविणारे असंख्य पालक आहेत. मात्र यात एजंट लोकच सर्व कारभार करीत असल्याने ते कधी फसवणूक करतील, याचा नेम नसल्याचे हे उदाहरण ठरावे.