बुलढाणा : महाराष्ट्र राज्याने एक लाख कोटी डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. यादृष्टीने बुलढाणा जिल्ह्यातील औद्योगिक गुंतवणुकीत वाढ करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने योजनांची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. यंदाच्या (२०२४-२५ च्या) आर्थिक वर्षातील एप्रिल ते ऑक्टोबर २०२४ कालावधीत निर्यात क्षेत्रात पश्चिम विदर्भात (अमरावती विभाग) बुलढाणा जिल्हा अव्वल ठरला आहे. या काळात बुलढाणा जिल्ह्यातून ४६५.१८ कोटी रुपयांच्या उत्पादनांची निर्यात झाली आहे.

जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त आकडेवारीनुसार, अमरावती विभागातील अमरावती जिल्ह्यातून २७९.४९ कोटी, यवतमाळ १५०.६६ कोटी, अकोला १४५.८३ कोटी आणि वाशीम जिल्ह्यातून ३१.५२ कोटी अशी एकूण १०७२.६७ कोटी रुपयांच्या उत्पादनांची निर्यात अमरावती विभागातून झाली असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा : राज्यातील वनक्षेत्रात मोठी घट

निर्यात होणारी उत्पादने

जिल्ह्यातून सेंद्रिय रसायने, रासायनिक उत्पादने, साबण, अभियांत्रिकी उत्पादने, तृणधान्य, दागिने, सोयाबीन संबंधित उत्पादने, बियाणे, भाज्या आणि कापूस गाठींची निर्यात होते. बुलढाणा जिल्ह्यातून सुदूर अंतरावरील, शेजारी आणि आखाती देशात निर्यात होते. अमेरिका, श्रीलंका, यूएई, सौदी अरब, ब्राझील, कोरीया, चीन, सिंगापूर, तुर्कीस्थान , थायलंड, बांगलादेश, पाकिस्तान, व्हिएतनाम, नेदरलँड, झिम्बाब्वे, मलेशिया आदी देश जिल्ह्यातील उत्पादनाचे आयातदार आहेत. या देशांमध्ये जिल्ह्यातून विविध उत्पादनांची निर्यात केली जाते. बुलढाणा जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्रासह, कृषी, अन्न प्रक्रिया, बांबू प्रक्रिया, रसायन, गृहोपयोगी वस्तू, अभियांत्रिकी उत्पादने, सेंद्रिय रसायने, कापड उत्पादने यासह अन्य क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध असल्याचे जिल्हाधिकारी पाटील म्हणाले. तसेच जिल्ह्यात उद्योग उभारण्यासाठी उद्योजकांना जिल्हा प्रशासनामार्फत आवश्यक सहकार्य करण्यात येत आहे.

हेही वाचा : Devendra Fadnavis : फडणवीस म्हणतात, “सावधान! पोस्ट फॉरवर्ड करणारे गुन्हेगार ठरतात…”

एमआयडीसीत भूखंड, ऑनलाईन निविदा

उद्योग सुरू करायचा म्हटले की, जागा कुठे मिळणार हा प्रश्न अनेकांसमोर असतो. परिणामी अनेकांच्या स्टार्टअप्स, उद्योग व व्यवसायांच्या संकल्पना अंमलात येत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने उद्योग व व्यवसाय सुरु करू इच्छिणाऱ्यांसाठी पाऊले उचलली आहे.जिल्ह्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग भूखंड आणि व्यापारी भूखंडाचे ऑनलाईन निविदा पद्धतीने वाटप करण्यात येणार आहे. महामंडळाचे लोणार (लघु) औद्योगिक क्षेत्रात दोन एमएसएमई भूखंड, खामगांव औद्योगिक क्षेत्रात दोन व्यापारी भूखंड, देऊळगाव राजा औद्योगिक क्षेत्रात एक, मलकापूर औद्योगिक क्षेत्रात एक आणि बुलढाणा (लघु) औद्योगिक क्षेत्रात एक व्यापारी भूखंड वाटप करण्यात येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या औद्योगिक क्षेत्रातील वाटपास उपलब्ध असलेले व्यापारी भूखंड ‘जसे आहे तसे व जेथे आहे तेथे’ या तत्त्वावर वाटप करण्यासाठी ३ जानेवारी २०२५ सायंकाळी ५ वाजेपर्यंत ऑनलाईन निविदा मागविण्यात आल्या आहेत. निविदा प्रक्रियेचा १५ दिवसांचा कालावधी संपल्यानंतर ज्या भूखंडांना “दोन पेक्षा कमी” निविदा प्राप्त होतील. त्या भूखंडांचा कालावधी १५ दिवसांकरीता वाढविण्यात येईल.