यवतमाळ : घरकुलाकरिता असलेला हप्ता मिळत नसल्याने एका तरुणाने अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. ही घटना आज जिल्ह्यातील आर्णी पंचायत समितीमध्ये घडली. गटविकास अधिकाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप करून युवकाची समजूत काढल्याने अनर्थ टळला.

संतोष उकंडराव बुटले (रा.माळेगाव, ता. आर्णी) याचे वडील उकंडराव विश्वनाथ बुटले यांना घरकुल योजनेतून घर मिळाले. त्यासाठी १५ हजार रुपयांचा पहिला हप्ता बुटले यांना मिळाला. मात्र, दुसरा हप्ता देण्यास पंचायत समितीमधील अधिकारी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप बुटले यांनी केला आहे.

हेही वाचा : बुलढाण्यावर पाणी टंचाईचे सावट! येळगाव धरणात १५ टक्के जलसाठा

वडील वयोवृद्ध असल्याने त्यांना ये-जा करणे शक्य नाही. त्यामुळे दुसरा हप्ता मिळावा म्हणून संतोष याने पाठपुरावा केला. मात्र, त्यात अपयश आले. वारंवार विनंती करूनही अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करीत त्याने आज टोकाचे पाऊल उचलले. गटविकास अधिकाऱ्यांच्या कक्षातच त्याने पेट्रोल अंगावर ओतून घेत स्वतः ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी गटविकास अधिकारी आर.आर.खरोडे यांनी वेळीच हस्तक्षेप करुन परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, घरकुलच्या हप्ता खात्यात जमा करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी पैसे मागत असल्याचा आरोप बुटले याने केला आहे. घरकुलाचे पैसे मिळावे म्हणून अनेक लाभार्थी पंचायत समितीत चकरा मारत असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा : जोगन्नाचा मृत्यू नक्षलवाद्यांच्या जिव्हारी; ३० मे रोजी गडचिरोली बंदचे आवाहन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिल्ह्यात मोठया प्रमाणात घरकुल मंजूर झाले आहेत. अनेकांची पावसाळ्यापूर्वी घर बांधण्याची लगबग सुरू आहे. मात्र अभियंते, अधिकारी पैसे घेतल्याशिवाय निधी बँकेत जमा करत नसल्याने लाभार्थी त्रस्त आहेत. या प्रकाराची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दखल घेतील काय, असा प्रश्न लाभार्थ्यांनी उपस्थित केला आहे.