यवतमाळ : आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना घायाळ करणारी अभिनेत्री रविना टंडन ही पांढरकवडा तालुक्यातील टिपेश्वर अभयारण्यात ‘आर्ची’ वाघिणीच्या अदांवर घायाळ झाली. रविना सध्या प्रचारानिमित्त विदर्भात आहे. प्रचार रॅलीत सहभागी होण्यापूर्वी रविना सोमवारी टिपेश्वर जंगल सफारीसाठी दाखल झाली होती.

टिपेश्वर जंगलाची सम्राज्ञी ‘आर्ची’ नामक वाघिणीने दर्शन दिल्याने रविनाची टिपेश्वर अभयारण्य सफारी सफल झाली. वाघिणीच्या दर्शनाने ती आनंदून गेली. टिपेश्वर अभयारण्यात हमखास वाघाचे दर्शन होत असल्याने मागील काही दिवसांत पर्यटकांचा ओढा वाढला आहे. हिंदी चित्रपट अभिनेत्री रविना टंडन ही सोमवारी अभयारण्याच्या सुन्ना गेटवर आपल्या सहकाऱ्यांसोबत पोहोचली. यासाठी रविवारी रात्रीच ती टिपेश्वर जवळील एका हॉटेलमध्ये मुक्कामी पोहचली. पहाटे सुन्ना गेटवरून तिने आत प्रवेश करत सफारीचा आनंद घेतला. टिपेश्वर अभयारण्यातील आर्ची नामक वाघीण मागील अनेक वर्षापासून पर्यटकांना आकर्षित करीत आहे. याच वाघिणीने रविना टंडनला दर्शन देत चांगलीच भुरळ घातली. तिला सकाळच्या सत्रात वाघिणीचे दर्शन झाल्याने ती आनंदी झाली. सुन्ना गेटवर सहायक वनसंरक्षक विजय कोंडावार, वनपरीक्षेत्र अधिकारी मंगेश बाळापुरे आदींनी तिचे स्वागत केले.

हेही वाचा : Video: अस्वलाचे वाघाला आव्हान! ताडोबाच्या जंगलातील थरार

टिपेश्वर अभयारण्यात पर्यटनासोबतच व्याघ्र दर्शन हमखास होत असल्याने येथे आता सेलिब्रिटीही येत आहेत. रविना यापूर्वी ताडोबा येथे येवून गेली आहे. दोन वर्षापूर्वी ‘पुष्पा’ चित्रपटाचा नायक अल्लू अर्जून टिपेश्वर अभयारण्यात आला होता. १४८ हेक्टर क्षेत्रावर पसरलेल्या टिपेश्वर अभयारण्यात डोंगरदऱ्या, तलाव मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे वाघांसोबतच हरिण, अस्वल, चांदी अस्वल, नीलगाय, रानकुत्रे, मोर, नवरं, घार, घुबड, गरूड आदी वन्यजीव व पक्षांचा मोठ्या प्रमाणावर अधिवास आहे. वाघाच्या हमखास दर्शनासाठी टिपेश्वर अभयारण्याची ओळख आहे, परजिल्ह्यासह अन्य राज्यातूनही पर्टक टिपेश्वर अभयारण्यात पर्यटनासाठी येत आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे पर्यटकांची गर्दी वाढली आहे.