यवतमाळ : गुप्तधन मिळवण्यासाठी अल्पवयीन मुलीला चटके देत अघोरी पूजा सुरू असलेल्या प्रकाराचा भांडाफोड यवतमाळ शहर पोलिसांनी सोमवारी केला. वंजारी फैल परिसरातील घरावर छापा टाकताच, पूजा करत असलेल्या व्यक्तीने धारदार शस्त्राने स्वतःच्या गळ्यावर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत त्याला रुग्णालयात दाखल केले असून, या प्रकरणात रात्री उशिरा गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, वंजारी फैल येथील महादेव परसराम पालवे (४४) आपल्या घरी दोन महिला व त्यांच्या मुलींना घेऊन अघोरी पूजा करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पंचांसह छापा टाकला असता, महादेव पालवे, त्याची पत्नी भारती, मुलगी श्रावणी, पीडित १६ वर्षीय मुलगी व तिची आई हे सर्वजण उपस्थित होते.

तपासा दरम्यान पीडित मुलीने दिलेल्या जबाबात, गुप्तधन मिळवण्यासाठी तिच्या अंगावर चटके दिल्याचे, तसेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी बळी देण्याचा कट असल्याचे स्पष्ट झाले. याच दरम्यान महादेव पालवेने घराच्या आत जाऊन धारदार चाकूने स्वतःच्या गळ्यावर वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यात घेऊन रुग्णालयात हलवले. या प्रकरणात महादेव पालवे याच्यावर भारतीय दंड संहिता, तसेच बाल न्याय (बाल संरक्षण) अधिनियम आणि महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधक कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्वतःचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याने स्वतंत्र गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. आरोपी महादेव हा एका रुग्णवाहिकेवर चालक आहे. पोलिसांनी या धाडीत सात लाख रुपये रोख, कासव, शंख, आणि अघोरी तांत्रिक पूजा साहित्याचा मोठा साठा जप्त केला. हे सर्व साहित्य कथित गुप्तधनासाठी वापरण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांच्या हस्तक्षेपाने वाचला मायलेकींचा जीव

पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने संभाव्य नरबळीचा घटना टळल्याची चर्चा आहे. गुरुपौर्णिमेला पीडित बालिकेचा गुप्तधनासाठी बळी देण्याचे नियोजन महादेव पालवे याने केल्याचे प्राथमिक चौकशीत पुढे आल्याने खळबळ उडाली. पीडित बालिकेसह तिच्या आईलाही आरोपीने गेल्या सहा महिन्यांपासून घरात कोंडून ठेवले होते. बालिकेवर अनन्वित अत्याचार झाल्याचे पुढे आले आहे. पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे बालिकेसह तिच्या आईचा जीव वाचला आहे.