नागपूर : वाघीण साधारणपणे एकाच वेळी दोन ते चार बछड्यांना जन्म देते. त्यामुळे एका वेळी सहा बछड्यांना जन्म देण्याची घटना दुर्मिळ आहे. परंतु, यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वनविभागात एका वाघिणीने सहा बछड्यांना जन्म दिला. विशेष म्हणजे, बछड्यांच्या सुरक्षिततेसाठी वनखात्याकडून तब्बल अडीच वर्षे गुप्तता पाळण्यात आली.
पांढरकवडा वनविभागातील ‘टी-३’ या वाघिणीने २०२२च्या अखेरीस सहा बछड्यांना जन्म दिला. यापूर्वी या वाघिणीने चार आणि नंतर एकदा पाच बछड्यांना जन्म दिला. ३ जानेवारी २०२३ ला वाघीण तिच्या सहा बछड्यांसह पहिल्यांदा ‘कॅमेरा ट्रॅप’मध्ये आली. त्यावेळी हे सहाही बछडे अगदीच लहान होते. व्याघ्रदर्शनाची पर्यटकांना असलेली ओढ आणि त्यासाठी प्रसंगी राजकीय ओळखीचा वापर लक्षात घेता तत्कालीन वनाधिकाऱ्यांनी वाघीण आणि तिच्या बछड्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे गुपित कायम राखले.
वनविभागातील पहिल्या फळीतील कर्मचारी ते वरिष्ठ अधिकारी या सर्वांनीच त्यांना पर्यटकांच्या गर्दीपासून दूर ठेवले. नागपूर जिल्ह्यातील उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात पर्यटकांच्या अशाच गर्दीमुळे ‘एफ-२’ वाघीण आणि तिच्या पाच बछड्यांच्या नैसर्गिक संवर्धनात अडथळे येत आहेत. हे प्रकरण न्यायालयात देखील गेले. गेल्या दीड वर्षांपासून सहा बछड्यांना जन्म देणारी वाघीण प्रत्यक्ष दिसली नाही, पण ‘कॅमेरा ट्रॅप’मध्ये तिचे छायाचित्र येत आहेत. तर हे सहाही बछडे आता जवळजवळ अडीच ते तीन वर्षांचे झाले असून, त्यांनी आपला स्वतंत्र मार्ग चोखाळला आहे.
व्याघ्र संवर्धनासाठी सुचिन्ह
● बिहारमधील वाल्मीकी व्याघ्रप्रकल्पात २०१४ मध्ये वाघिणीने सहा बछड्यांना जन्म दिला होता. त्यानंतर २०२२च्या अखेरीस पांढरकवडा वनविभागात या घटनेची पुनरावृत्ती झाली. विशेष म्हणजे, वाल्मीकी व्याघ्रप्रकल्पातील हे सहाही बछडे निरोगी आणि चांगले होते. त्याचप्रमाणे पांढरकवडा वनविभागातील सहाही बछडे निरोगी आणि सुदृढ असल्याने वाघांच्या संवर्धन प्रयत्नांसाठी हे सुचिन्ह मानले जात आहे.
● सहा बछड्यांना जन्म ही घटना प्रादेशिक वनविभागातील वाघांच्या यशस्वी संवर्धन प्रयत्नांचे हे लक्षण आहे. ऐतिहासिकदृष्ट्या वाघ वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत अनुसूची-१ मध्ये असणारा प्राणी असून, तो नामशेषाच्या जवळ मानला जातो. मात्र, या घटनांनी व्याघ्रसंवर्धनाच्या दृष्टीने भारताचे पडत असलेले पाऊल योग्य दिशेने असल्याची ग्वाही दिली जात आहे.
वाघिणीने पाच किंवा सहा बछड्यांना जन्म देणे ही दुर्मिळ घटना आहे. उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात ‘फेअरी’ या वाघिणीने पाच बछड्यांना जन्म दिला होता. तर तिच्याच मोठ्या झालेल्या ‘एफ-२’ या मादीनेही पाच बछड्यांना जन्म दिला. मात्र, सहा बछड्यांचा जन्म ही खूपच दुर्मिळ घटना असून उत्तम संवर्धनाचे ते प्रतीक आहे. – कुंदन हाते, माजी सदस्य, राज्य वन्यजीव मंडळ