लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यवतमाळ: लग्नसराई आणि उन्हाळ्याच्या सुट्यांमुळे बसस्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाल्याने चोरांचे फावत आहे. बुधवारी सायंकाळी चोरट्यांनी लग्नात नवरी मुलीस देण्यासाठी आणलेले तीन लाखांचे दागिने लंपास केल्याने खळबळ उडाली. मंगळवारी येथूनच एका महिलेचे ६२ हजारांचे दागिने पळवले होते. बसस्थानकरावरील चोरींच्या घटनांना पोलीस गांभीर्याने घेत नसल्याने चोरट्यांचे मनोबल वाढल्याची ओरड प्रवाशांमधून होत आहे.

यवतमाळचे उत्तम स्थितीतील बसस्थानक पाडून येथे ‘बसपोर्ट’ करण्यासाठी चार वर्षांपूर्वी बसस्थानक तात्पुरत्या जागेत सुरू केले. येथे सुविधांची वाणवा आहे. जागा अपुरी असल्याने प्रवाशांची कायम गर्दी असते. सध्या लग्नसराई आणि सुट्टीसोबतच महिलांना अर्धी तिकीट झाल्यापासून बसमध्ये गर्दी वाढली आहे. हीच गर्दी चोरांचे लक्ष्य ठरत आहे. गेल्या काही दिवसांपासून बसस्थानकावर चोरींच्या घटनांत लक्षणीय वाढ झाली आहे. मंगळवारी अकोला बसमध्ये चढत असलेल्या बेबी राजेंद्र चौधरी या महिला प्रवाशाची पर्स चोरट्यांनी लंपास केली. पर्समधील ६२ हजार रूपयांचे दागीने लंपास झाल्याची तक्रार त्यांनी अवधूतवाडी पोलिसांत केली.

हेही वाचा… बुलढाणा : मालमोटारीची दुचाकीला धडक; चालक ठार, दुचाकीने क्षणात पेट घेतला अन्..

या घटनेची चौकशी सुरू असताना बुधवारी सायंकाळी राजूसिंग चव्हाण (रा. अमरावती) हे पत्नीसह घाटंजी तालुक्यातील कोळी खुर्द येथे जाण्यासाठी अमवतीहून आले होते. ते बसमध्ये बसले असताना ते नवरीसाठी घेऊन जात असलेले तीन लाख रूपयांचे दागीने बॅगमधून चोरी गेल्याचे त्यांना लक्षात आले. त्यांनी तातडीने अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला.

हेही वाचा… नागपुरात पावसामुळे कच्च्या विटांची माती, २५ लाखांची हानी

तक्रारीत अज्ञात असलेले चोर सर्वांनाच ज्ञात !

यवतमाळातील एका विशिष्ट भागातील महिलांच्या टोळ्या नवीन व जुने बसस्थानक परिसरात घुटमळत असतात. महिला प्रवासी या टोळीचे टार्गेट असते. प्रवाशी बसमध्ये चढताना या टोळीतील महिला गोळा होवून बसमध्ये चढण्यासाठी गोंधळ घालून रेटारेटी करतात. या गोंधळात या टोळीतील अन्य सदस्य हातसफाई करतात. यासाठी अनेकदा लहान मुलांचाही वापर होतो. पोलिसांसह येथे वावर असलेले नागरिक, बसचे चालक, वाहक सर्वांनाच ही महिला टोळी ज्ञात आहे. मात्र प्रवाशांनी चोरीची तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यापलिकडे पोलीस ठोस कारवाई करत नाही. पोलिसांनी बसस्थानकावर प्रवशांचा चोरट्यांपासून बचाव करण्यासाठी बंदोबस्त वाढविण्याची मागणी आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In yavatmal worth three lacks jewellery of bride stole by thieves near bus stop nrp 78 dvr
First published on: 04-05-2023 at 12:38 IST