अकोला : जिल्ह्यातील गुन्हे दोषसिद्धीच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. महिला, बालकांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यात या वर्षातील पहिल्या चार महिन्यात १२ गुन्हेगारांना न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावली. न्यायालयातील खटल्यांची गती देखील वाढली आहे.सन २०२५ मध्ये महिलांवरील बलात्कार, विनयभंग तसेच बालकांवरील अत्याचाराच्या प्रकारांमध्ये पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी गुन्हेगारांविरोधात कठोर पाऊले उचलली आहेत. जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात एकूण १२ गुन्ह्यात गुन्हेगारांना शिक्षा झाली. भारतीय न्याय संहिता कलम ७४ प्रमाणे महिला अत्याचार प्रकरणात दाखल गुन्ह्यात पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनात नऊ गुन्ह्यांमध्ये जलदगतीने सात दिवसांत आरोपीतांना अटक केली. गुन्ह्याचा तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. न्यायालयासोबत समन्वय साधून दाखल गुन्ह्यामध्ये अतिजलद खटला चालविण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला. प्रत्येक दाखल गुन्ह्यात गंभीरपणे पाठपुरावा करून आरोपीतांना अटक करणे, त्यांचे विरूद्ध प्रतिबंधक कारवाई करणे व शिक्षा होईपर्यंत अकोला पोलिसांकडून पाठपुरावा केला जात आहे.

मूर्तिजापूर पोलीस ठाण्यांतर्गत एका घटनेमध्ये बालकावरील अत्याचाराच्या प्रकरण घडले होते. त्याच्या नातेवाईकाने बालकावर अत्याचार केला होता. या प्रकरणामध्ये पोलिसांनी सखोल तपास करून सबळ साक्षी व पुराव्य सादर केले. त्या आधारावार न्यायालयाने आरोपीस २० वर्षांच्या सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. बार्शिटाकळी पोलीस ठाण्यांतर्गत शाळेतील शिक्षकांनी पीडित विद्यार्थ्यांसोबत गैरकृत्य केले होते. या प्रकरणाची तक्रार पोलिसांकडे प्राप्त होताच वेगाने तपास करण्यात आला. न्यायालयात  दोषारोपपत्र सादर करण्यात आले. साक्षी व पुरावे योग्य पद्धतीने मांडले. या बहुचर्चित प्रकरणात आरोपी शिक्षकांना सहा वर्ष शिक्षा सुनावण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१० आरोपींना एक ते तीन वर्षांची शिक्षा

महिला, विद्यार्थिनी व बालकावरील विनयभंग प्रकरणामध्ये एकूण १० आरोपींना एक ते तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अकोला जिल्हा पोलिसांकडून महिला, विद्यार्थी व बालकावरील अत्याचाराच्या गुन्ह्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले. गुन्ह्याच्या तपास अधिकाऱ्यांनी चौकशी केले. साक्षी व पुरावे न्यायालयात दाखल केले. महिला व बालकांवरील अत्याचाराच्या विरोधातील गुन्ह्यांमध्ये आरोपींना विद्यमान न्यायालयाद्वारे कठोर शिक्षा सुनावण्यात आली आहे. पोलिसांकडून सखोल तपास व न्यायालयाने सबळ साक्षी व पुराव्यामुळे आरोपींना शिक्षा सुनावल्याने पीडितांना न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.