नागपूर : उपराजधानीत गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असताना डेंग्यूचे संकट वाढत चालले आहे. मागील २८ दिवसांत शहरात तब्बल १८ नवीन डेंग्यू रुग्णांची नोंद झाली असून, येत्या काळात या आजाराचा प्रादुर्भाव आणखी वाढेल अशी भीती आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. याबाबत आपण जाणून घेऊ या.
नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, नागपूर शहरात १ जानेवारी २०२५ ते ३१ जुलै २०२५ या कालावधीत फक्त १३ डेंग्यूचे रुग्ण आढळले होते. परंतु १ आॅगस्ट २०२५ ते २८ ऑगस्ट २०२५ दरम्यान तब्बल १८ नवीन रुग्णांची भर पडली. म्हणजेच, एका महिन्यातच मागील सात महिन्यांपेक्षा दुप्पट रुग्ण नोंदले गेले. यामुळे आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे.
नागपुरातील तज्ज्ञांचा इशारा…
नागपुरातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते, पावसाळ्यात डासांची उत्पत्ती झपाट्याने वाढते. त्यात गणेशोत्सवामुळे शहरात होणारी गर्दी, मंडपांमध्ये साचणारे पाणी आणि लोकांची मोठी हालचाल या सगळ्यामुळे संसर्ग पसरण्याची शक्यता जास्त आहे. अनेक रुग्णांमध्ये डेंग्यूसदृश लक्षणे दिसत असून, एलायझा चाचणीत अहवाल निगेटिव्ह आला तरीही रुग्ण पूर्णपणे सुरक्षित आहेत असे म्हणता येत नाही, असे तज्ज्ञ स्पष्ट करतात.
नागरिकांवर परिणाम
शहरातील विविध भागांत लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत रुग्णसंख्या वाढताना दिसते आहे. काही रुग्णांना ताप, डोळ्यांत वेदना, अंगदुखी यांसारखी लक्षणे असून त्यांना सणातील कार्यक्रमांपासून दूर राहावे लागत आहे. एकूण ३१ रुग्णांची नोंद (जानेवारी ते २८ ऑगस्ट २०२५ पर्यंत) झाली असून ही संख्या पुढील काही आठवड्यांत आणखी वाढण्याची भीती आहे.
महापालिकेतर्फे सावधगिरीचे उपाय…
महापालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे की, आमच्याकडून आवश्यक उपाय केले जात असल्याने आजार नियंत्रणात आहे. परंतु सगळ्यांनीच घराभोवती पाणी साचू देऊ नका, डासांची पैदास रोखा, मच्छरदाणी व प्रतिबंधक क्रीम वापरा. ताप किंवा अंगदुखीची लक्षणे दिसल्यास तातडीने तपासणी करून घ्यावी. गणेश मंडळांनीही मंडप परिसर स्वच्छ ठेवून पाणी साचू न देण्याची जबाबदारी पार पाडावी. डेंग्यूचे लक्षणे असलेले रुग्ण आढळताच तातडीने नागपुरातील मेडिकल, मेयोसह महापालिकेच्या रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
कोरोनाचीही चिंता
दरम्यान, नागपूर शहरात १ जानेवारी २०२५ ते २८ ऑगस्ट २०२५ दरम्यान १०८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी ६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे डेंग्यूसह करोना या दोन्ही आजारांचा धोका नागरिकांवर कायम असल्याचे स्पष्ट होते.