लोकसत्ता टीम

नागपूर : महिलांना एसटीच्या भाड्यात ५० टक्के सावलत दिल्यानंतर प्रवासी वाढले आणि एसटीचे उत्पन्न वाढले, असे सांगणारे सरकार निवडणूक होताच एसटी तोट्यात असल्याचे सांगून भरमसाठ दर वाढ करते, ही गरीब जनतेची लूट आहे, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. एसटी ही महाराष्ट्रातील जनतेची जीवनवाहिनी आहे. गरीब, मजूर, महिला, कामगारांसाठी एसटी असताना त्यांना वेठीस धरणे योग्य नाही. त्यामुळे एसटी दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

नागपूर येथे आज पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले की एसटी मध्ये भ्रष्टाचार होत आहे, बस खरेदीचे कंत्राट आता सरकारने रद्द केले. एसटी महामंडळात होणाऱ्या भ्रष्टाचाराला सरकार खतपाणी घालत आहे, ह्यात एसटीचा तोटा होत नाही का? याचा भार गोरगरीब , सामान्य जनतेवर सरकार का लादत आहे , असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. एसटी दरवाढ ही गरिबांची लूट आहे , म्हणून ही दरवाढ मागे घ्यावी अशी भूमिका विजय वडेट्टीवार यांनी मांडली.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बाबत सर्वोच्च न्यायालयात लवकरच सुनावणी होणार आहे. यावेळी सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण सुरक्षित ठेवले पाहिजे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० हजार जागा या ओबीसींच्या हक्काच्या आहेत. त्यामुळे ओबीसी आरक्षणशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नये, असे झाले तर ओबीसी समाज हे सहन करणार नाही असा इशारा देखील वडेट्टीवार यांनी दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बीड मधील संतोष देशमुख प्रकरणात वाल्मीक कराड याच्या एका मागून एक प्रॉपर्टी समोर येताना इडी, सीबीआय तपास का करत नाही. कराडची प्रॉपर्टी जप्त केली तर त्याचा आका जो मंत्री आहे त्याची प्रॉपर्टी जप्त होईल ,सरकारची अशी काय मर्जी कराड वर आहे असा प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.