महेश बोकडे
नागपूर : संपानंतर कर्मचारी रुजू झाल्यावर एसटीची प्रवासी सेवा आता पूर्वपदावर येत आहे. बसफेऱ्यांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे प्रवासी शुल्कात संभाव्य गैरप्रकाराची शक्यता लक्षात घेऊन नागपूरच्या विभाग नियंत्रक कार्यालयाने भरारी पथकांची संख्या वाढवली आहे. राज्यात नागपुरात हा प्रकल्प राबवला जाणार असून महामंडळाने राज्यभरातही हा निर्णय लागू केल्यास त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे.
नागपूर विभाग नियंत्रक कार्यालयाच्या अखत्यारित जिल्ह्यातील सुमारे ८० किलोमीटरचे क्षेत्र येते. नागपूरहून मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलांगणा, आंध्रप्रदेशातही एसटीच्या बसेस धावतात.
एसटी महामंडळाचे सध्या आठ भरारी पथके कार्यरत आहेत. ही पथके बसेसमध्ये आकस्मिकरित्या भेट देऊन कोणत्याही मार्गावर प्रवाशांची तिकिटे व वाहकाकडील शुल्काची रक्कम तपासतात. विनातिकीट प्रवास करताना कोणी आढळून आल्यास कारवाई होते.
नागपुरातील ८ भरारी पथकांपैकी एक पथक साप्ताहिक रजेवर असते. त्यामुळे ७ पथके रोज सेवेवर असतात. दरम्यान मधल्या काळात सुमारे साडेपाच ते सहा महिने कर्मचाऱ्यांचा संप चालला. या काळात कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले नाही. त्यामुळे ते आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या हातून चूक होण्याची शक्यता नकारता येत नाही. त्यामुळे एसटीच्या नागपूर विभाग नियंत्रक कार्यालयाने भरारी पथकांची संख्या तीनने वाढवली. त्यामुळे आता येथे ११ भरारी पथके कार्यरत राहणार आहेत.
सुटीचा एक दिवस सोडला तर १० पथके गैरप्रकार होऊ नये म्हणून कार्यरत राहतील. यातून महामंडळाचा महसूल वाढण्याची शक्यता अधिकारी वर्तवत आहे.
राज्यात सुमारे ३१ विभाग नियंत्रक कार्यालये आहेत. या सर्व ठिकाणी हा प्रयोग केल्यास गैरप्रकारांना आळा बसण्याची शक्यता आहे.

महामंडळाने एसटीतील गैरप्रकार नियंत्रणासाठी इलेक्ट्रॉनिक तिकीट यंत्रातून (ईटीआयएम) तिकीट देण्याचा निर्णय घेतला. विभाग नियंत्रक कार्यालयातील पथकाकडून आकस्मिक तपासणी केली जाते. यामुळे गैरप्रकार कमी झाले. नागपूर विभागात भरारी पथकांची संख्या तीनने वाढवण्यात आली आहे.’’-नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ, नागपूर.