नागपूर : २०३६ मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेच्या यजमानपदासाठी भारत तयार आहे. मात्र त्यापूर्वी भारताला विविध खेळांमध्ये आणखी पदकेही मिळवायची आहेत. भारतात कशाचीही कमतरता नाही. आम्हाला जास्तीत जास्त पदकांसाठी तयारी करावी लागेल, असे मत आंतरराष्ट्रीय माजी धावपटू आणि भारतीय ऑलिम्पिक असोसिएशच्या अध्यक्ष पी.टी. उषा यांनी व्यक्त केले.
खासदार क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने पी.टी. उषा नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होत्या. ॲथेलिटमध्ये अनेक नवीन चांगले खेळाडू समोर येत आहेत. क्रीडा क्षेत्रात भारताची कामगिरी सुधारत असताना आपल्याकडे चांगल्या क्रीडा अकादमी निर्माण होण्याची गरज आहे. त्यासाठी खाजगी संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. ग्रामीण भागात सोयी सुविधा नसतानाही खेळाडूंची संख्या वाढत आहे. ही आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. केंद्र सरकार क्रीडा क्षेत्राबाबतीत सकारात्मक आहे, असेही पी.टी. उषा यांनी सांगितले.
हेही वाचा >>> विदर्भाला लोहयुग, मौर्यपूर्व व मौर्य वाकाटक कालखंडाचा वारसा
डोपिंग थांबवण्यासाठी स्पर्धाबाह्य चाचण्या व्हाव्या
काही खेळाडू मादक पदार्थ (डोपिंग) घेऊन खेळतात. हे टाळण्यासाठी स्पर्धाबाह्य चाचण्या अधिक वाढवल्या पाहिजे. असे प्रकार थांबवण्यासाठी योजना तयार केल्या जात आहेत. ज्यावेळी स्पर्धा नसतात त्यावेळी खेळाडूंची चाचणी व्हावी अशी आमची इच्छा आहे. शिवाय जनजागृतीचे वर्ग घेतले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.