नागपूर : शहरात दिवसेंदिवस ‘स्वाईन फ्लू’चे संक्रमण वाढत असून सणासुदीवर या आजाराचे सावट पसरले आहे. २४ तासांत १३ नवीन रुग्ण आढळल्याने येथील रुग्णसंख्या दोनशेपार गेली आहे. गुरूवारी आरोग्य विभागाच्या मृत्यू विश्लेषण समितीच्या बैठकीत आणखी ५ मृत्यू या आजाराने घेतल्याचे पुढे आल्याने या आजाराने आजपर्यंतच्या बळींची संख्या दुप्पट म्हणजे १० झाली आहे.

नवीन मृत्यूंमध्ये शहातील ३, ग्रामीणमधील १, मध्यप्रदेशातील शिवनीतील १ अशा एकूण ५ रुग्णांचा समावेश आहे. शहरात दगावलेल्यांध्ये धरमपेठ झोनमधील ७७ वर्षीय पुरुष, ४० वर्षीय पुरुष अशा दोघांसह हनुमाननगर झोन येथील ८५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. नागपूर ग्रामीणमधील नांद गावातील एका ३१ वर्षीय महिलेचाही या आजाराने बळी घेतल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे शहरातील आजपर्यंतची मृत्यूसंख्या ६, नागपूर ग्रामीण २, इतर जिल्हे वा राज्य २ अशी एकूण १० रुग्णांवर पोहचली आहे.

दरम्यान, आरोग्य विभागातील मृत्यू विश्लेषण बैठकीत इतर ३ दगावलेल्या रुग्णांना ‘स्वाईन फ्लू’ची बाधा झाली असली तरी मृत्यूचे कारण हृदयरोग, क्षयरोग, ‘एचआयव्ही’ असल्याने पुढे आले. त्यामुळे हे मृत्यू ‘स्वाईन फ्लू’ ऐेवजी इतर कारणाने झाल्याचे नोंदवले गेले. २४ तासांत शहरात ८, शहराबाहेरील ५ असे एकूण १३ नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या ‘स्वाईन फ्लू’ग्रस्तांची संख्या १२९, ग्रामीण ८२ अशी एकूण २११ रुग्णांवर पोहचली आहे. तर एकूण रुग्णांतील शहरात ६३ आणि शहराबाहेरील ३६ असे एकूण ९९ रुग्ण बरे झाले आहेत.

रुग्णालयांत ९९ रुग्ण

शहरातील विविध शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये ‘स्वाईन फ्लू’चे नागपूर महापालिका हद्दीत राहणारे ५७ आणि शहराबाहेरील ४२ असे एकूण ९९ रुग्ण दाखल आहेत. त्यातील महापालिका हद्दीतील ३ आणि शहराबाहेरील १ असे एकूण ४ रुग्ण जीवनरक्षण प्रणालीवर (व्हेंटिलेटर) आहेत.

 ‘स्वाईन फ्लू’चे रुग्ण पुढे आणखी वाढण्याची शक्यता असली तरी योग्य काळजी घेतल्यास हा आजार टाळता येतो. करोना होऊन गेलेल्यांना फुफ्फुसांचा संसर्ग लवकर होऊ शकतो. या व्यक्तींना ‘स्वाईन फ्लू’ची बाधा झाल्यास जोखीम वाढते. त्यामुळे या रुग्णांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जास्त काळजी घ्यावी. महापालिकेचा आरोग्य विभाग पूर्ण क्षमतेने आजार नियंत्रणासाठी प्रयत्न करत आहे.

– डॉ. गोवर्धन नवखरे, नोडल अधिकारी, साथरोग विभाग, महापालिका.

चंडिपुरा संशयित चिमुकलीचा मृत्यू

नागपूर जिल्ह्यातील खापा कोदेगाव येथील एका ४ वर्षीय मुलीचा नागपुरातील न्यू हेल्थ सिटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या मुलीचा हिवताप, जपानी मेंदूज्वर, डेंग्यू या तपासण्यांचा अहवाल नकारात्मक आल्या. परंतु मुलीची अचानक चार दिवसांत प्रकृती अत्यवस्थ होऊन झालेला मृत्यू बघता तिचे नमुने तपासणीसाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. येथे चिंडिपुराची तपासणी झाल्यावर मृत्यूचे कारण स्पष्ट होण्यास मदत होणार आहे.

रुग्णालयातील करोनाग्रस्तांची संख्या पुन्हा वाढली

नागपूरच्या शहरी भागात दिवसभरात ३६, ग्रामीणला २० असे एकूण ५६ नवीन करोनाग्रस्त आढळले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनाग्रस्तांची संख्या ४ लाख ५ हजार ३५, ग्रामीण १ लाख ७१ हजार ३७, जिल्ह्याबाहेरील ९ हजार ९९६ अशी एकूण ५ लाख ८६ हजार ६८ रुग्णांवर पोहचली आहे. तर दिवसभरात शहरात ४७, ग्रामीणला असे एकूण ६४ रुग्ण करोनामुक्त झाले. त्यामुळे गुरूवारी शहरात ३१४, ग्रामीणला १६६ असे एकूण ४८० सक्रिय करोनाग्रस्त नोंदवले गेले. त्यापैकी गंभीर संवर्गातील ४५ रुग्ण विविध रुग्णालयांत तर ४३५ रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.