|| शफी पठाण
मार्चमध्ये आयोजनासाठी आग्रही; नाशिकआधी चर्चेस मात्र घटक संस्थांचा नकार
नागपूर : नाशिकचे साहित्य संमेलन अधांतरी असतानाच साहित्य महामंडळ मात्र आता उदगीरसाठी उतावीळ झाले आहे. तिथे मार्च-२०२२ मध्ये संमेलनाच्या आयोजनासाठी सदस्यांमध्ये सार्वमत तयार व्हावे, यासाठी महामंडळाची धडपड सुरू आहे. महामंडळातील घटक संस्थांच्या प्रतिनिधींनी मात्र नाशिकचा विषय मार्गी लागल्याशिवाय उदगीरवर चर्चेस स्पष्ट नकार दिला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साहित्य महामंडळाच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त २ व ३ ऑक्टोबरला अमरावतीत दोन दिवसीय संमेलन पार पडले. यादरम्यान महामंडळाची महत्त्वाची बैठकही झाली. या बैठकीत महामंडळाचे व बैठकीचेही अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी नवीन वर्षात उदगीरमध्ये संमेलन घेण्याबाबत चर्चेची सुरुवात केली. परंतु पुण्याच्या मराठी साहित्य परिषदेसह इतर काही घटक संस्थांच्या प्रतिनिधींनी आधी नाशिकच्या संमेलनाचा विषय मार्गी लावा, त्यानंतरच पुढच्या संमेलनाबाबत बोलू, अशी ठाम भूमिका घेतली. नाशिक संमेलनाच्या तारखांचा गोंधळ व आयोजकांसोबतच्या पत्रव्यवहाराचा वाद शमलेला नसताना नव्या संमेलनाबाबत चर्चा वा घोषणा योग्य ठरणार नाही. त्यातून महामंडळाच्या उतावळेपणाबाबत चुकीचा संदेश जाईल, याकडेही या प्रतिनिधींनी अध्यक्षांचे लक्ष वेधले.
बैठकीचा सूर उदगीरबाबतच्या निर्णयाविरुद्ध जात असल्याचे बघून ‘‘तुम्ही दरवेळी अडवणूक का करता’’, अशी तक्रार अध्यक्षांनी घटक संस्थांच्या प्रतिनिधींकडे केली, अशी माहितीही सूत्रांनी
दिली. दरम्यान, उदगीर येथील राजकीय-साहित्य क्षेत्रात कार्यरत रामचंद्र तिरुके यांनी सहकाऱ्यांसह उदगीरला संमेलन घेण्याबाबत ठाले- पाटलांशी आधीच सविस्तर चर्चा केल्याचे समजते.
नाशिकचे संमेलन नोव्हेंबरअखेर?
करोना प्रादुर्भाव कमी होत आहे. त्यामुळे नोव्हेंबरच्या शेवटच्या
आठवड्यात नाशिक येथे संमेलन घेण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे. साहित्य महामंडळही याबाबत अनुकूल आहे. या विषयावरही अमरावतीच्या बैठकीत चर्चा झाली. करोनाशिवाय इतर कुठले ‘विघ्न’ न आल्यास नोव्हेंबरच्या शेवटी हे बहुप्रतीक्षित संमेलन होण्याची दाट शक्यता आहे.
तीन महिन्यांच्या आत दोन संमेलने!
नाशिकचे संमेलन नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये झाले तरी पुढच्या तीनच महिन्यांत नवीन संमेलन घेतले जावे, यासाठी महामंडळाची धडपड आहे. यानंतर महामंडळ मराठवाडा साहित्य परिषदेकडून मुंबईकडे जाणार आहे. त्यानंतर थेट १२ वर्षांनीच ते पुन्हा मराठवाड्याकडे येईल. आपल्या कार्यकाळात एकाही संमेलनाचा अनुशेष शिल्लक राहू नये, शिवाय करोनाकाळातही मराठवाडा साहित्य परिषदेने ‘करून दाखवले’ हा संदेश साहित्य क्षेत्रात जावा, यासाठी महामंडळाचे अध्यक्ष टोकाचा विरोध पत्करूनही उदगीरच्या संमेलनासाठी आग्रही असल्याचे समजते. विशेष म्हणजे, दीड वर्षाआधीच मराठवाड्यातील उस्मानाबाद येथे संमेलन झाले आहे. तरी पुन्हा मराठवाड्याचाच आग्रह का, असा प्रश्नही या बैठकीत उपस्थित करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.