नागपूर आंतरराष्ट्रीय मेडिकल हब होणार – मुख्यमंत्री

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारत-ब्रिटनचा संयुक्त प्रकल्प; १५०० कोटींची गुंतवणूक; दोन लाख रोजगार निर्मिती

भारत आणि ब्रिटन (युके) संयुक्त प्रकल्पांतर्गत देशात एकूण ११ हेल्थ मेडिसिटीचे निर्माण करणार असून त्यातील पहिल्या प्रकल्पाचे भूमिपूजन रविवारी नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. मिहानमध्ये १५० एकर जागेत १५०० कोटी रुपयांचा हा प्रकल्प उभा राहणार असून तो तीन टप्प्यात २०२९ पर्यंत पूर्ण होणार आहे.

प्रकल्पात संशोधन, वैद्यकीय महाविद्यालय, नर्सिग ट्रेनिंग इन्स्टिटय़ूटसह पंचतारांकित हॉटेलचाही समावेश असणार आहे. पहिला टप्पा तीन वर्षांत पूर्ण होणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

या आरोग्य सेवाविषयक प्रकल्पामुळे देशाच्या मध्यस्थानी असलेल्या नागपूरच्या ‘हेल्थ टुरझिमकडे’ वाटचाल सुरू झाली आहे. देशविदेशातील रुग्ण येथे येऊन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आरोग्य सेवेचा लाभ घेऊ शकतील. त्याचप्रमाणे मिहानमध्ये एम्सही सुरू होत आहे. राष्ट्रीय कॅन्सर इन्स्टिटय़ूटचीही स्थापना मिहानजवळच होत आहे. त्यामुळे नागपूर आता आंतरराष्ट्रीय मेडिकल हब म्हणूनही नावारूपास येईल. परिसरातील व्याघ्र प्रकल्पांमुळे हे शहर टायगर कॅपिटल म्हणून ओळखले जाते. हेल्थ मेडिसिटीमुळे विदेशातून येणाऱ्या पर्यटकांना उपचारासह पर्यटनस्थळांना त्यांना भेटी देता येईल, या प्रकल्पामुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या दोन लाख लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल, असे फडणवीस म्हणाले.

खापरीतील लि-मेरिडियन येथे रविवारी झालेल्या कार्यक्रमात भारतातील ब्रिटिश उच्चायुक्त कार्यालयातील उपसंचालक जैनी ग्रेडी, इंडो-युके इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थ मेडिसिटीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अजय राजन गुप्ता, मिहानचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी यावेळी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ब्रिटन दौऱ्यादरम्यान जारी करण्यात आलेल्या दोन्ही देशाच्या संयुक्त निवेदनामध्ये या उपक्रमाचा समावेश होता. जगात प्रथमच अशाप्रकारचा प्रकल्प फक्त भारतात राबविला जात असून त्यासाठी देशातील अकरा शहरांची निवड करण्यात आली आहे. त्यात नागपूरचा समावेश आहे. यासाठी भारतात भारत-ब्रिटन आरोग्य प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली असून ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य सेवा संस्थेच्या वतीने ही रुग्णालये चालविली जातील, असे अजय राजन गुप्ता यांनी कार्यक्रमानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

तीन टप्प्यात बांधकाम

पहिली हेल्थ मेडिसिटी लंडनमधील किंग्ज कॉलेज हॉस्पिटलच्या सहकार्याने विकसित केली जाणार असून हा प्रकल्प २०१९ पर्यंत पूर्ण होईल. एकूण १००० खाटांचे हॉस्पिटल येथे राहणार असून पहिल्या टप्प्यात म्हणजे तीन वर्षांत २५० खाटांचे हॉस्पिटल तयार होईल. तेथे अत्याधुनिक सुविधा माफक दरात उपलब्ध होईल. ब्रिटनमधील आरोग्य सेवा ही जगातील सवरेत्कृष्ट म्हणून ओळखली जाते. त्याचा लाभ वैदर्भीयांना मिळेल. रुग्णालयाशिवाय संशोधन, उपचार साहित्याची निर्मिती, प्राणायाम, योगा आणि जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध होईल, असे जेनी ग्रेडी यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: International medical hub in nagpur
First published on: 14-08-2017 at 00:56 IST