गडचिरोली : सव्वा वर्षांपूर्वी गडचिरोलीतून पुण्याला गेलेले पोलीस अधिकारी अंकित गोयल यांना बढती देत पुन्हा गडचिरोलीची जबाबदारी देण्यात आल्याने नक्षलवाद्यांची चिंता वाढली आहे. त्यांनी आपल्या गडचिरोली पोलीस अधीक्षक पदाच्या कार्यकाळात राबवलेल्या आक्रमक नक्षलविरोधी अभियानात मिलिंद तेलतुंबडे सारख्या मोठ्या नक्षलनेत्यासह तब्बल ५५ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले होते. त्यामुळेच त्यांच्यावर गडचिरोलीच्या पोलीस उपमहानिरीक्षक पदाची जबाबदारी देण्यात आल्याचे बोलल्या जात आहे.

राज्य पोलीस दलात बुधवारी झालेल्या खांदेपालटानंतर अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यात पुण्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना बढती देत गडचिरोलीचे पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले. २०१९ मध्ये कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडा मार्गावर नक्षल्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंगस्फोटात १५ पोलीस जवान शहीद झाले होते. त्यानंतर अंकित गोयल यांच्याकडे गडचिरोलीच्या पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी आपल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात नक्षल्यांच्या बिमोडासाठी विशेष रणनीती आखून नक्षलविरोधी अभियान राबवले. सोबतच ‘दादालोरा खिडकी’ सारखे उपक्रम सुरू करून पोलीस आणि आदिवासींमध्ये एक संवाद सेतू निर्माण केला. यात त्यांना मिळालेल्या यशामुळे नक्षल चळवळीचे कंबरडेच मोडल्या गेल्याचे बोलले जाते. यादरम्यान झालेल्या चकमकीत गडचिरोली पोलीस दलाच्या नक्षलविरोधी सी ६० पथकाने ५५ नक्षल्यांना ठार केले, तर ६१ नक्षल्यांना अटक करण्यात आली. या दरम्यान १९ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले होते.

हेही वाचा : माघ मासातील स्नान महात्म्य; काय आहे पुराणातील सार जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विशेष म्हणजे नक्षल्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य तसेच दंडकारण्य झोनचा प्रमुख मिलिंद तेलतुंबडे याला ठार करण्यात यश आल्याने नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला. यात अनेक महत्वाचे नक्षल नेते ठार झाले होते. तेव्हापासून जिल्ह्यात नक्षल कारवायांवर अंकुश आहे. वर्तमान पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी ती परंपरा कायम ठेवली आहे. त्यामुळेच मागील तीन वर्षांपासून नक्षल्यांचे अनेक मोठे नेते भूमिगत झाले. तर काही अबुझमाडमध्ये पळून गेले. केवळ सीमाभागात नक्षल्यांच्या हालचाली आहेत. परंतु गडचिरोलीत प्रभावी कामगिरी करणारे संदीप पाटील यांना बढती देत नक्षलविरोधी अभियानाचे महानिरीक्षक तर त्यांच्या जागी अंकित गोयल यांची नियुक्ती करण्यात आल्याने शेवटची घटका मोजत असलेली नक्षल चळवळ संपुष्टात येईल, अशी आशा पोलीस वर्तुळात व्यक्त केल्या जात आहे.