लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर: गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध भागातील भटक्या श्वानांच्या त्रासाला आळा घालण्यात महापालिका अपयशी ठरत आहे. लाखो रुपये खर्च करून भटक्या श्वानांना पकडण्यासाठी महापालिकेने वाहने खरेदी केली. मात्र, या वाहनांचा काही उपयोग प्रशासनाकडून होत नसल्यामुळे अनेक भागात श्वानांची दहशत निर्माण झाली आहे.

शहरातील भटक्या श्वानांच्या प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना बुधवारी वाठोडच्या घटनेनंतर हा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गेल्या काही दिवसात शहरातील विविध भागासह वर्दळीचे रस्ते, चौक, मांसविक्रीची दुकाने असलेल्या भागात नागरिकांना रात्रीचे सोडा, दिवसाही घरातून बाहेर पडणे अवघड झाले आहे. अनेक लहान मुले घरासमोर खेळत असताना त्यांना या भटक्या श्वानांमुळे खेळणे कठीण झाले आहे. शहरातील भटक्या श्वानांची संख्या कमी करण्यासाठी महापालिकेतर्फे गेल्या काही वर्षांपासून नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात येते. मात्र श्वानांची आजघडीला असलेली संख्या व होणाऱ्या शस्त्रक्रिया यात मोठी तफावत असल्याने श्वानांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच आहे. महापालिकेकडून उपाययोजना केल्या जात असल्या तरी त्याची अंमलबजावणी मात्र केली जात नसल्याचे चित्र आहे.

आणखी वाचा- चंद्रपूर: पोरगा आमदार तरी ‘माय’ मात्र व्यवसायाशी एकनिष्ठ, ८० व्या वर्षी यात्रेत विकते बांबूच्या ‘टोपल्या’

नागरिकांच्या तक्रारी वाढल्या की नावापुरती कारवाई करुन श्वानांना पकडले जाते आणि त्यांना भांडेवाडी येथे काही दिवस ठेेवून पुन्हा सोडून दिले जाते. त्यामुळे या भटक्या श्वानांचा प्रश्न गंभीर झाला असून लोकांमध्ये विशेषत: लहान मुलांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून श्वानांच्या नसबंदीवर दरवर्षी लाखो रुपयांची उधळपट्टी केली जात आहे. महापालिकेने गेल्या सहा वर्षांत केवळ ५ हजार ९२९ कुत्र्यांवर नसबंदी शस्त्रक्रिया केल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे उर्वरित कुत्र्यांचे प्रजनन झपाट्याने वाढत आहे.

श्वान मालकांकडून नियमांकडे दुर्लक्ष

शहरात पाळीव कुत्र्यांचीही संख्या मोठी आहे. या कुत्र्यांची त्यांचे मालक घरच्यापुरती तर काळजी घेतात, मात्र लोकांना त्यांचा त्रास होतो त्याबाबत ते दुर्लक्ष करतात. पाळीव श्वानांचा परवाना देताना त्यांच्या मालकांना महापालिकेचे नियम लागू आहेत त्या नियमांचे पालन श्वान मालकांकडून होत नाही.

रस्त्यावरील ठेले, चायनिज विक्रेत्यांमुळे अपघाताला निमंत्रण

शहरातील विविध भागात मांसाहरी आणि चायनीज पदार्थ विकणाऱ्यांची संख्या वाढली आहे. या ठिकाणी शिल्लक राहिलेले अन्न, मांसाहारी पदार्थ रस्त्यावरील श्वानांना खायला घातले जातात. त्यामुळे या गाड्यांच्या आसपास कुत्री कायम भटकत असतात. रात्रीच्या वेळी या परिसरातून जाणाऱ्या पादचारी, वाहनचालकांच्या मागे श्वान धावतात. परिणामी, अपघाताला निमंत्रण मिळते.

या भटक्या श्वानांवर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेने वाहने घेतली आहे. श्वानांना पकडून भांडेवाडीमध्ये ठेवले जाते मात्र नसबंदी करुन त्यांना सोडून दिले जाते. वाठोडाची घटना गंभीर आहे. शहरात या भटक्या श्वानांची पकडण्याची कारवाई सुरू आहे. -डॉ. गजेंद्र महल्ले, आरोग्य अधिकारी, महापालिका

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Issue of stray dogs is remain nagpur municipal corporation failed to solve vmb 67 mrj
First published on: 14-04-2023 at 08:58 IST