नागपूर : देशातील अनेक राज्यांमध्ये तापमानात कमालीची वाढ झाली असताना पुन्हा एक नवीन संकट येऊ घातले आहे. आंध्रप्रदेशात कमाल तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसवर तर महाराष्ट्रातील विदर्भात तो ४४ अंश सेल्सिअसवर गेला असताना येत्या सोमवारपासून पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

गेल्या चार-पाच दिवसांपासून सुर्यनारायण अक्षरशः कोपला आहे. सकाळपासूनच उन्हाचे चटके बसायला लागले आहेत. उन्हाचे चटके चांगलेच वाढले असताना गेल्या काही दिवसात थांबलेले अवकाळी पावसाचा संकट पुन्हा येऊ घातले आहे. महाराष्ट्रासह देशभरात अनेक ठिकाणी सोमवारपासून पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, नांदेड जिल्ह्यातील काही ठिकाणी तर विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यातील काही ठिकाणी विज आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दिला.

हेही वाचा…राज्यात वीज चिंता! कोराडीतील ६६० मेगावॉटचा संच बंद

विशेषकरून विदर्भात विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा असण्याची शक्यता आहे. दरम्यान, शनिवारी विदर्भातील तापमानाने कमाल पातळी गाठली होती. तर आज रविवारी त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.