नागपूर : राज्यात २०१९ पूर्वीच्या प्रत्येक वाहनाला उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) बसवणे बंधनकारक आहे. परंतु बऱ्याच वाहनांना तांत्रिक दोष उद्भवून पाटी लावता येत नव्हती. शेवटी परिवहन खात्याने वाहन विक्रेत्यांना काही प्रकरणात ऑनलाईन वाहन नोंदणीसह पाटी बसवण्याचे अधिकार दिल्याने राज्यातील हजारो वाहन चालकांना दिलासा मिळाला आहे. त्याबाबतचे अधिकार सर्व आरटीओ कार्यालयांना मिळाले आहेत. या अधिकाराअंतर्गत वाहन विक्रेते काय करू शकणार? याबाबत आपण जाणून घेऊ या.

केंद्रीय मोटार वाहन नियमानुसार, १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या प्रत्येक वाहनाला एसएसआरपी वाहन क्रमांक पाटी बसवणे बंधनकारक आहे. राज्यात ही पाटी बसवण्याची गती सुरुवातीला संथ होती. परंतु सरकारने पाटी बसवण्यासाठी दिलेल्या विशिष्ट मुदतीनंतर संबंधित वाहनावर कारवाईचे संकेत दिल्यावर पाटी लावण्याची गती वाढली. दरम्यान राज्यात जी वाहने १ एप्रिल २०१९ पूर्वी उत्पादित झाली आणि वाहनाची नोंदणी १ एप्रिल २०१९ नंतर झाली त्यांची एचएसआरपी नंबर प्लेटसाठी ऑनलाईन नोंदणी होत नव्हती. त्यामुळे त्यांना एचएसआरपी नंबर पाटी लावता येत नव्हती.

दरम्यान नंबर पाटीसाठी ऑनलाईन नोंदणी न होणाऱ्या प्रकरणात वाहन उत्पादित कंपनी व वाहन विक्री वितरकांकडून वाहन विक्री बंद झालेल्या कारणावरून संबंधित वाहन उत्पादक कंपनीचे वाहन ऑनलाईन दिसत नव्हते. परराज्यांमध्ये नोंदणी झालेले वाहन आरपीएमकरिता सादर होऊन राज्यात वाहन क्रमांक जारी झालेल्या वाहनांनाही एचएसआरपी नंबर पाटी लावता येत नव्हत्या. बीडी, बीटीआयद्वारे ट्रांसपोर्ट टू नाॅन ट्रांसपोर्ट किंवा नाॅन ट्रान्सपोर्ट टू ट्रांसपोर्ट केलेली वाहने, आयातीत वाहनेही ऑनलाईन दिसत नव्हती.

त्यामुळे या क्रमांकांना एसएसआरपी पाटी लावणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नव्हते. वाहनांवर बसवलेली एचएसआरपी क्रमांकाची पाटी खराब होणे, गहाळ होणे, तुटलेल्या वाहनांनाही ही पाटी पुन्हा मिळण्यात अडचणी येत होत्या. शेवटी परिवहन आयुक्त कार्यालयाने वाहनाची ऑनलाईन नोंदणीसह पाटी लावण्याचे अधिकार वाहन विक्रेत्यांना दिले आहेत. त्यामुळे या पाटीसाठी ऑनलाईन तांत्रिक दोष दूर होईल. या वृत्ताला नागपूर ग्रामीणचे प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांनी दुजोरा दिला.

वाहन विक्रेत्यांकडे लवकर पाटी लावून मिळणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बऱ्याच नागरिकांना तांत्रिक कारणाने वाहनाला उच्च सुरक्षा नंबर पाटी लावण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया करता येत नव्हती. त्यामुळे ही पाटी लागली नाही तर भविष्यात त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार होती. वाहन विक्रेत्यांना आता काही प्रकरणात या वाहनांची नोंदणीचे अधिकार परिवहन खात्याने दिल्याने संबंधिताला वाहन विक्रेत्यांकडे या पाटीसाठीची नोंदणी करता येणार आहे. त्यानंतर त्यांना मिळणाऱ्या वेळेवर येथेच त्यांना ही पाटी लावून मिळणार आहे.