गडचिरोली : झारखंडमधील हजारीबाग जिल्ह्यातील गोरहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पंटिटरी जंगल परिसरात आज सोमवारी सकाळी सुरक्षा दल व नक्षलवाद्यात झालेल्या चकमकीत तीन जहाल नक्षल ठार झाले. यात केंद्रीय समिती सदस्य सहदेव सोरेन याचा समावेश असून त्याच्यावर विविध राज्यात चार कोटीहून अधिक बक्षीस होते. आठवडाभरात दोन केंद्रीय समिती सदस्य ठार झाल्याने नक्षल चळवळीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, पंटिटरी जंगल परिसरात मोठ्या संख्येने नक्षलवादी एकत्र आल्याची गोपनीय माहिती सुरक्षा यंत्रणेला मिळाली होती. त्यावरून सोमवारी सकाळी या परिसरात ‘कोब्रा २०९ बटालियन’ पथक आणि स्थानिक पोलिसांनी शोधमोहीम राबवली होती. दरम्यान, जंगलात दडून असलेल्या नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत तीन नक्षलवादी ठार झाले. केंद्रीय समिती सदस्य सहदेव सोरेन, झारखंड-बिहार झोनल समिती सदस्य रघुनाथ हेंब्रम, झोनल समिती सदस्य बिरसन गंझू अशी ठार झालेल्या नक्षलवाद्यांची नावे आहेत. सर्वांवर मिळून झारखंडमध्ये २ कोटींहून अधिक बक्षीस होते तर सहदेव सोरेन याच्या विविध राज्यात मिळून चार कोटीपेक्षा अधिक बक्षीस होते. सोरेन गेल्या अनेक वर्षांपासून पासून सुरक्षा दलाच्या ‘रडार’वर होता. घटनास्थळावरून एके ४७ बंदूकसह मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
केंद्रीय समितीला धक्का
तीन दिवसांपूर्वी छत्तीसगडमधील गरियाबंद येथे झालेल्या चकमकीत केंद्रीय समिती सदस्य मनोज ठार झाला होता. दोन दिवसांपूर्वी केंद्रीय समिती सदस्य तथा सर्वोच्च महिला नक्षल नेता सुजाता हिने तेलंगणात आत्मसमर्पण केले. त्यांनतर सोमवारी सहादेव सोरेन झारखंडमध्ये ठार झाल्याने नक्षल चळवळीला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. केंद्रीय समिती ही नक्षलवाद्यांची सर्वोच्च समिती आहे. वर्षभरात जवळपास सात केंद्रीय समिती सदस्यांना ठार करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. हे विशेष.
झारखंडमध्ये नक्षल चळवळ संपुष्टात?
गृहमंत्री अमित शहा यांच्या नक्षलमुक्त भारतच्या घोषणेनंतर देशभरात नक्षलविरोधी मोहीम तीव्र करण्यात आली आहे. सध्याच्या घडीला दंडकारण्यातील छत्तीसगड, गडचिरोली, ओडिशा, तेलंगणा, झारखंड आदी भागात नक्षल चळवळ सक्रिय आहे. छत्तीसगड महाराष्ट्रात सुरू असलेल्या कारवाईमुळे काही नक्षल तेलंगणा, झारखंड ओडिशाच्या सीमावर्ती भागात आश्रय घेत आहेत. त्यामुळे सुरक्षा यंत्रणेने याही परिसरात नक्षलविरोधी मोहीम अधिक गतिमान केली आहे. झारखंडमध्ये वर्षभरात विशेष नक्षल विरोधी पथक कोब्रा २०९ बटालियनने दोन केंद्रीय समिती सदस्य, दोन राज्य समिती सदस्य, चार झोनल समिती सदस्यांसह ३० जहाल नक्षलवाद्यांना ठार केले आहे. त्यामुळे झारखंडमध्ये नक्षल चळवळ शेवटची घटका मोजत असल्याचे याभागातील अभ्यासक सांगतात.