स्वयंचलित पद्धतीने तीन तासांत कृत्रिम दातांची निर्मिती
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय लवकरच ‘कॅडकॅम’ हे सुमारे एक कोटी रुपयांचे अद्ययावत उपकरण येणार आहे. त्यावर रुग्णांच्या दातांचे स्कॅनिंगवर मोजमाप होऊन सुमाने तीन तासांत स्वयंचलित पद्धतीने कृत्रिम दात अचूक मापांचे तयार होतील. त्यामुळे रुग्णाच्या दातांचे माप घेण्यात मानवी हस्तक्षेप कमी होऊन दातांच्या निर्मितीसह दंतच्या उपचारात अचूकता येण्यास मदत होईल.
नागपूर, मुंबई व औरंगाबाद अशी तीनच शासकीय दंत महाविद्यालये व रुग्णालये महाराष्ट्रात आहेत. मुंबईला इतर एक दंत महाविद्यालय असले तरी ते महापालिकेच्या आखत्यारित येते. विदर्भासह मध्य भारतात नागपूर वगळता इतरत्र ही शासकीय संस्था नसल्याने दंत रुग्णांवर उपचाराचा मोठा भार दंत महाविद्यालयावर आहे. शासनाने मध्य भारतातील दंतच्या रुग्णांना अद्ययावत सेवा मिळाव्या म्हणून नागपूरच्या शासकीय दंत महाविद्यालयात तज्ज्ञ डॉक्टरांसह अद्ययावत यंत्र सामग्री उपलब्ध करून दिली आहे. या संस्थेत रुग्णांमध्ये दातांचे विविध प्रकारचे आजार आढळत असून दात तुटल्यामुळे कृत्रिम दात बसवण्याकरिता येणाऱ्यांचीही संख्याही येथे जास्त आहे.
दंत रुग्णालयात वर्षांला सुमारे १ हजार ७०० जणांना कृत्रिम दातांची गरज भासते. सध्या या संस्थेत या रुग्णांच्या दातांचे माप घेण्याकरिता तंत्रज्ञांची मदत घेतली जाते. माप घेतल्यावर हे दात तयार करण्याची सुविधा येथे नसल्याने रुग्णांना थेट खासगी पॅथॉलॉजीचा रस्ता दाखवल्या जात असल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. या रुग्णांचा त्रास कमी करण्याकरिता प्रशासनाने जिल्हा नियोजन समितीकडे सन २०१६- १७ मध्ये एक कोटींच्या कॅडकॅम (कंप्युटराईज्ड असिस्टेड डिझाईन अॅन्ड कंप्यूटराईज्ड असिस्टेड मेकॅनीक) चा प्रस्ताव पाठवला. त्याला मंजुरी मिळताच खरेदी प्रक्रियेला गतीही दिली आहे.
स्वयंचलित पद्धतीने रुग्णाच्या तुटलेल्या दातांचे चित्र काढून ते संगणकाकडे जाईल. संगणकावरून या डिझाईनने दात तयार करण्याच्या सूचना या उपकरणाला संलग्न असलेल्या दुसऱ्या उपकरणाला मिळेल. सुमारे तीन तासांत हे कृत्रिम दात तयार होताच ते रुग्णाला लावले जाईल. हे उपकरण आल्यावर निश्चितच सर्वाधिक लाभ नागपूरच्या दंत रुग्णांना होईल. राज्यातील दंतच्या संस्थेतील सर्वात अद्यावत तंत्रज्ञानावर आधारित हे उपकरण राहणार असल्याचा दावा शासकीय दंत महाविद्यालयाचे सहयोगी प्रा. डॉ. वैभव कारेमोरे यांनी केला.
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाकडून सगळ्याच गटातील रुग्णांसह वेळीच अद्ययावत उपचार केले जातो. संस्थेकडून मागास व दुर्गम भागात जावून शिबिराच्या मदतीनेही हजारोंना दंतच्या आरोग्य सेवेचा लाभ दिला जातो. हे उपकरण आल्यावर यातील कृत्रिम दातांची गरज असलेल्या रुग्णांना निश्चितच लाभ होईल.
– डॉ. विनय हजारे, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर