नागपूर: आपल्याला १९४७ जे मिळाले ते स्वातंत्र्य नव्हे, तर भीक होती. भारताला खरे स्वातंत्र्य २०१४ साली (भाजप केंद्रात सत्तेवर आल्यानंतर) मिळाले, असे वक्तव्य अभिनेत्री कंगना रणौत यांनी दोन वर्षांमध्ये केले होते. यावर सर्व बाजूंनी टीका सुरू झाली आहे. तिने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य केले. त्यावर मुलाखतकर्त्या महिलेने म्हणून तर लोक तुम्हाला भगवान मानतात, असे उद्गार काढल्याने लोकांच्या संतापात अधिकच भर पडली आहे. तिचे हे वक्तव्य म्हणजे देशद्रोह असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला नागपुरात संघ परिवारातील विद्यापीठ शिक्षण मंचाच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्सव कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत कार्यवाह अतुल मोघे यांनी १९४७ ला भारताला मिळालेले स्वातंत्र्य हे खंडित होते असे वक्तव्य केले. यामुळे संघाचे कंगनाच्या वक्तव्याला अप्रत्यक्ष समर्थन असल्याची टीका होत आहे.
१९२० मध्ये नागपूर येथे झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पहिले सरसंघचालक डॉ. केशव हेडगेवार यांनी सर्वातआधी संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मांडला होता, असा दावाही अतुल मोघे यांनी केला.
मोघे म्हणाले, १९३० साली काँग्रेसच्या लाहोर येथे झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मान्य झाला ती तारीख २६ जानेवारी होती. याची आठवण राहावी म्हणून त्याच दिवशी भारताने संविधानाचा स्वीकार केला. परंतु, त्याही आधी १९२० मध्ये डॉ. हेडगेवार हे काँग्रेसचे सदस्य होते. १९२० च्या अधिवेशनात ते सक्रिय होते. त्यावेळी त्यांनी दोन ठराव मांडले होते. यात पहिला ठराव हा संपूर्ण स्वातंत्र्याचा तर दुसरा ठराव जगाला भांडवलशाही क्षेत्राच्या बाहेर काढण्यासाठी भारताची भूमिका महत्त्वाची राहणार असून देशाने त्याचे नेतृत्व करावे, यासाठीचा होता. डॉ. हेडगेवारांनी १९२० मध्ये मांडलेला प्रस्ताव काँग्रेसने १९३०च्या अधिवेशनात मान्य केला, असेही मोघे म्हणाले.
येणाऱ्या काळात भारताला जगाचे नेतृत्व करावे लागणार असून अखंड भारतही होणार असल्याचा दावा मोघे यांनी केले. यासाठी प्राध्यापकांची भूमिका महत्त्वाची आहे. प्राध्यापकाने शिकवत असताना जागतिक दृष्टिकोन डोळ्यांसमोर ठेवायला हवा. आज जगात व्यापारावरून वाद होत आहे. भारतावर आपले वर्चस्व थोपवण्याचा प्रयत्न काही देश करत आहेत. मात्र, यासाठी अमेरिका आणि रशियाला दोष देण्यात काहीही अर्थ नाही. त्यांचे राजकारण ते करतात. कुणाचा वचपा काढणे किंवा एखाद्या देशाविषयी मुद्दाम काही कुरापती करणे ही भारतीय संस्कृती नाही. खरी संस्कृती जपणारा देश म्हणजे भारत, ही आपली ओळख आहे. आपण हा सांस्कृतिक ठेवा जपला आहे. वसुधैव कुटुंबकम् म्हणणारा जगात फक्त भारत देश आहे, असेही ते म्हणाले.
२०२१ मध्ये एका मुलाखतीत भारताला १९४७ साली मिळालेले स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नसून ती भीक होती, खरे स्वातंत्र्य हे २०१४ साली मिळाले असं वक्तव्य अभिनेत्री कंगना रणौतने केलं असून यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. कंगनाच्या या वक्तव्यावरुन भाजपाच्या नेत्यांकडूनही नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनीदेखील यावरुन संताप व्यक्त केला असून तिला देण्यात आलेले सर्व राष्ट्रीय पुरस्कार काढून घेण्यात यावे अशी मागणी पत्रकार परिषदेत बोलताना केली होती.