महेश बोकडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : आपल्या कर्मचाऱ्यांच्या दत्तक मुलींनाही हिंदू ह्रदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजनेचा लाभ देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. या सुधारित आदेशानंतर राज्यात पहिले प्रकरण मंजूरही झाले आहे.

एसटी महामंडळाच्या मुंबई सेंट्रल कार्यालयातून एका कर्मचाऱ्याने दत्तक घेतलेल्या मुलीला या योजनेतून लाभ मिळावा म्हणून अर्ज केला होता. त्याला तातडीने मंजुरी देण्यात आली. तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी २०१६ मध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या मुलींसाठी ही योजना आणली. १ एप्रिल २०१६ नंतर जन्मास येणाऱ्या मुलीच्या नावे १७ हजार ५०० रुपये दामदुप्पट योजनेत ठेवण्याचे निश्चित झाले.

योजनेंतर्गत मुलीस तिच्या २१ व्या वर्षी एकरकमी एक लाख रुपयांचे सहाय्य दिले जाते. परंतु या योजनेंतर्गत दत्तक घेतलेल्या मुलीस आर्थिक सहाय्य देण्याबाबत सूचना नव्हत्या. त्यामुळे अशा आशयाच्या तक्रारी या कार्यालयास मिळत होत्या. त्यामुळे महामंडळाने ५ ऑगस्ट २०२२ रोजी सुधारित परिपत्रक काढून दत्तक मुलींनाही योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मुंबई सेंट्रलमधून पहिले प्रकरण मंजूर करण्यात आले. या वृत्ताला एसटीचे महाव्यवस्थापक (क.व.औ.स) अजित गायकवाड यांनी दुजोरा दिला.

मुलीचे वय सहा वर्षांहून कमी हवे

एसटी कर्मचाऱ्याच्या कुटुंबाने अनाथ मुलीस दत्तक घेतले असेल तर त्या मुलीला त्यांची प्रथम मुलगी मानून या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील. यासाठी मुलीचे वय ० ते ६ वर्षे दरम्यान हवे. अर्जदाराकडून दत्तक मुलीच्या जन्माच्या ६ वर्षांपर्यंत अर्ज स्वीकारता येतील. वाढीव जास्तीत जास्त २ महिन्यांपर्यंत आणखी मुदतवाढ दिली जाईल. दत्तक मुलीव्यतिरिक्त एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या इतर जन्मलेल्या मुलींसाठी त्यांच्या जन्माच्या एका वर्षांच्या विहीत मुदतीपर्यंत दाव्यासाठी अर्ज स्वीकारता येतील.

वर्षभरात ७६० मुलींना लाभ

२०२१-२२ या आर्थिक वर्षांत एसटी कर्मचाऱ्यांच्या ७६० मुलींना या योजनेचा लाभ देण्यात आला. यातील कुठलीही मुलगी दत्तक घेण्यात आलेली नव्हती.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kanyadan yojana st employees benefits adopted daughter ysh
First published on: 19-08-2022 at 00:02 IST