२८ संघटना सहभागी होणार
शासकीय कार्यालयात सेवा देणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांची गेल्या अनेक वर्षांपासून प्रश्न प्रलंबित असून त्या निकालात काढण्याकरिता आंदोलन करण्याची गरज आहे. या प्रश्नावर मंथन करून आंदोलनाची दिशा ठरवण्याकरिता २१ ऑक्टोबरला नागपूरच्या सावरकर चौकातील विजयश्री पराते सभागृहात सकाळी १० वाजता संमेलन आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती कास्ट्राईब महासंघाचे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांनी पत्रपरिषदेत दिली.
संमेलनात प्रामुख्याने सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, प्रा. देविदास घोडेस्वार, माहिती व जनसंपर्क विभागाचे माजी संचालक भी.म. कौसल, माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक मोहन राठोड, डॉ. भाऊ दायदार, उच्च न्यायालयाचे अधिवक्ता अ‍ॅड. प्रभाकर मारपकवार उपस्थित राहतील. कास्ट्राईब महासंघाच्या अंतर्गत राज्यभरात २८ संघटना कार्य करीत असून ५ लाखावर संघटनेचे सदस्य आहे. संघटनेने गेल्या अनेक वर्षांत कर्मचाऱ्यांकरिता अनेक आंदोलने केल्याने काही प्रश्न निकाली निघाले. परंतु आजही अनेक समस्या कायम असून त्या आंदोलनाशिवाय सुटणे शक्य नसल्याचे
दिसते.
मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे हे प्रश्न निकाली काढण्याकरिता संमेलनात या विषयांवर चर्चा केली जाणार आहे.
संमेलनाच्या शेवटी कामगारांच्या न्यायाकरिता आंदोलनाची दिशा ठरवल्या जाईल. शासन कामगारांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने बघत नसल्याबद्दल याप्रसंगी खंत व्यक्त करण्यात आली. पत्रपरिषदेला प्रामुख्याने सत्यदेव रामटेके, बाळासाहेब बनसोड, सुभाष गायकवाड, बबनराव ढाबरे, सोहन चवरे, दिलीप चवरे, राहुल बागडे, जालंदर गजभारे, अविनाश इंगळे, चंदन चावरीया, जगन्नाथ सोरटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.