• स्वतंत्र शस्त्रक्रियागृह नसल्याचा रुग्णांना फटका
  • ह्रदय़ाच्या शस्त्रक्रियात दोन दिवस लांबणीवर

सुपरस्पेशालिटी रुग्णालयात किडनी प्रत्यारोपणाकरिता स्वतंत्र शस्त्रक्रियागृह नसल्याचा फटका येथील किडनीसह ह्रदयाच्या रुग्णांनाही बसत आहे. किडनी प्रत्यारोपणाकरिता ह्रदयरोग विभागाचे शस्त्रक्रियागृह वापरले जाते. त्यामुळे ह्रदयाच्या शस्त्रक्रिया दोन दिवस थांबविल्या जात असल्याने या ताटकळत असलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्यास जबाबदार कोण? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, सुपरस्पेशालिटीत एका किडनी प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेतील रुग्णाचा नुकताच मृत्यू झाला असून दुसऱ्याचे प्रत्यारोपण ३० जूनला प्रस्तावित केले गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मध्य भारतातील एकाही शासकीय रुग्णालयात किडनी प्रत्यारोपण करण्याची सुविधा उपलब्ध नव्हती. महाराष्ट्र शासनाकडून गेल्या काही वर्षांमध्ये अनेकदा घोषणा झाल्यावरही नागपूरच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयात किडनी प्रत्यारोपण विविध तांत्रिक कारणाने सुरू होत नव्हते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेत सुपरस्पेशालिटी रुग्णालयात किडनी प्रत्यारोपणाच्या विषयावर अनेक उच्चस्तरीय बैठका घेतल्या. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे व सुपरचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. मनीष श्रीगिरीवार या दोन्ही अधिकाऱ्यांनी त्यांना तांत्रिक व आर्थिक समस्या समजावून सांगितल्या.

दोन्ही नेत्यांकडून पाठिंबा मिळाल्याने तातडीने डॉ. निसवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. श्रीगिरीवार यांनी प्रस्ताव तयार करून ते शासनाकडे सादर केले. शेवटी सगळे अडथळे दूर होऊन सुपरला किडनी प्रत्यारोपणाचा शुभारंभ झाला. प्रत्यारोपण सुरू झाल्यापासून येथे तीन शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत. त्यामुळे आईकडून मुलीला, बहिणीकडून भावाला, आईकडून मुलाला जीवदानही मिळाले आहे. त्यातच एक रुग्ण गेल्या अनेक दिवसांपासून सुपरला किडनी प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत होता. वारंवार त्याच्या प्रकृतीत बदल होत होते. शेवटी त्याची प्रकृती काही दिवसांपूर्वी अचानक खालवल्याने त्याचा मृत्यू झाला.  ३० जूनला होणाऱ्या प्रत्यारोपणाला पत्नी आपल्या पतीला किडनी दानातून जीवदान देण्याचा प्रयत्न करणार आहे. दरम्यान, या शस्त्रक्रियेकरिता पुन्हा ह्रदयाच्या शस्त्रक्रिया दोन दिवस थांबविल्या जाणार असल्याने येथील दोनहून जास्त गंभीर गटातील रुग्ण प्रतीक्षेत राहणार आहेत. सुपरस्पेशालिटीत मध्य भारतातील रुग्ण मोठय़ा संख्येने ह्रदयाच्या शस्त्रक्रियेसाठी येत असतात. तेव्हा शासन येथील स्वतंत्र शस्त्रक्रियागृहाचे काम केव्हा पूर्ण करणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

स्वतंत्र शस्त्रक्रियागृह लवकरच

सुपरस्पेशालिटी रुग्णालयात किडनी प्रत्यारोपणाकरिता स्वतंत्र शस्त्रक्रियागृहाचा प्रस्ताव शासनाला दिला आहे. त्याला शासन सकारात्मक असून लवकरच ते होण्याची आशा आहे.

– डॉ. मनीष श्रीगिरीवार, विशेष कार्यकारी अधिकारी, सुपरस्पेशालिटी रुग्णालय, नागपूर</strong>