अमरावती : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त म्हणजेच १७ सप्टेंबर रोजी ते पंतप्रधानपदाची जबाबदारी सोडतील आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नितीन गडकरी यांचे नाव अमित शहा यांच्या जागी पुढे करेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली असतानाच भाजपच्या एका गटाने पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात ‘डिसेंबर २०१२’ सारखेच बदनामीचे षडयंत्र रचण्यास सुरुवात केली आहे, असा आरोप शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केला आहे.

किशोर तिवारी म्हणाले, २०१२ मध्ये, जेव्हा गडकरी भाजपचे सलग अध्यक्ष बनून त्यांच्या नेतृत्वाखाली २०१४ ची लोकसभा निवडणूक लढवली जाईल आणि ते पंतप्रधान होतील, अशी शक्यता निर्माण झाली होती, तेव्हा अरविंद केजरीवालांसह काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्यावर ‘तृप्ती समूहा’च्या साखर कारखान्यासाठी मोठा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. पुढे हे सर्व आरोप खोटे ठरले आणि अरविंद केजरीवाल यांना बिनशर्त माफी मागावी लागली होती. त्यावेळी अनेक वरिष्ठ भाजप नेत्यांनीच ‘गुजरात लॉबी’च्या वतीने हे षडयंत्र रचले होते. आता, ऑगस्ट-सप्टेंबर २०२५ मध्ये, त्याच कटाची पुनरावृत्ती केली जात आहे.

बिनबुडाचे आरोप आणि चुकीची माहिती

सध्या गडकरी यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून आपली मुले निखिल आणि सारंग यांना शेकडो कोटींचा फायदा मिळवून दिला असल्याच्या बातम्या प्रसारित केल्या जात आहेत. यासाठी भाजपच्या आयटी सेलवर शेकडो कोटी रुपये खर्च केले जात असल्याचा गंभीर आरोप तिवारी यांनी केला आहे. गडकरी यांच्यावर करण्यात आलेले हे सर्व आरोप निराधार आणि वेदनादायक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

नितीन गडकरी गेल्या ४० वर्षांपासून कृषी कचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प चालवत आहेत. त्यावेळी त्यांची मुले शाळेत होती. ब्राझीलसारख्या अनेक देशांमध्ये बायोगॅसचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतरच, पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटनेने बायोगॅसला पेट्रोलियम मिश्रित इंधनाची परवानगी दिली. त्यानंतर इथेनॉलचा वापर सुरू झाला. सध्या पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाची परवानगी मिळाल्यानंतर या कंपन्यांचे शेअर्स ३०० पटींनी वाढले आहेत. पण ही किंमत काल्पनिक आणि आभासी असल्याचे तिवारी यांनी सांगितले.

इथेनॉलचे सर्वाधिक उत्पादन पश्चिम महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, बिहार आणि बंगालच्या गंगापट्ट्यात होते. पश्चिम विदर्भात इथेनॉल उत्पादन ५ टक्के सुद्धा होत नाही. त्यामुळे पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप मूर्खपणाचा आहे, असे तिवारी म्हणाले.