स्वामी विवेकानंद मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे उद्घाटन

कोराडीच्या महालक्ष्मी जगदंबादेवीच्या दर्शनासाठी मध्यभारतातून मोठय़ा प्रमाणात भाविक एकत्र येतात. त्यांची योग्य व्यवस्था व्हावी तसेच भक्तीसोबत पर्यटनाचा निखळ आनंद मिळावा, यासाठी पर्यटन विकासाचा विशेष आराखडा तयार करण्यात आला आहे. हे काम दोन टप्यात पूर्ण करण्यात येईल. या प्रकल्पामुळे कोराडी मध्य भारतातील पर्यटनाचे प्रमुख केंद्र म्हणून पुढे येईल, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. कोराडीतील स्वामी विवेकानंद मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.

कार्यक्रमाला प्रामुख्याने ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पर्यटन व रोजगार हमी मंत्री जयकुमार रावल, खासदार कृपाल तुमाने, आमदार विकास कुंभारे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निशा सावरकर, प्रधान सचिव बिपीन श्रीमाळी, स्वामी विवेकानंद मेडिकल मिशनचे अध्यक्ष डॉ. दिलीप गुप्ता उपस्थित होते. या रुग्णालयातील अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांचा महानिर्मितीतील सगळ्या कंत्राटी, कायमसह इतरही कामगारांसोबतच ग्रामस्थानीही लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

या रुग्णालयाकरिता महानिर्मितीने सीएसआर निधीतून ५ कोटी ६७ लाख रुपये खर्च केला आहे. २० खाटांचे हे रुग्णालय ५० खाटांचे करण्याचे प्रयत्न असून त्याकरिता प्रयत्न सुरू आहे. कोराडी तलावाच्या सौंदर्यीकरणासह खोलीकरणाकरिता महानिर्मितीकडून ५० कोटींचा निधी खर्च केला जाणार असल्याचे पालकमंत्री बावनकुळे म्हणाले. कार्यक्रमात कृपाल तुमाने, बिपीन श्रीमाळीसह इतरही मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

पर्यटन विकासाला चालना

जागतिक पर्यटकांच्या दृष्टीने निसर्ग, जंगल तसेच वाघाची सफारी हे मुख्य आकर्षण आहे. विदर्भात या पर्यटनाला मोठी संधी असल्यामुळे जगातील पर्यटकांना येथे आणण्यासोबतच त्यांना आवश्यक सुविधाही उपलब्ध करून देण्यात येतील. पर्यटनासोबतच रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असल्यामुळे पर्यटन विकासाला चालना देण्याचे धोरण शासनाने स्वीकारले आहे, असे मत पर्यटन व रोगगार हमी मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केले.

कोराडी महोत्सवाला राष्ट्रीय स्वरूप -रावल

महालक्ष्मी जगदंबा देवीच्या नवरात्र उत्सवासोबतच कोराडी सांस्कृतिक व पर्यटन महोत्सव उत्कृष्टरीत्या आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाला राष्ट्रीय दर्जा मिळाला आहे. यापुढे मोठय़ा प्रमाणात तो साजरा केला जाईल, असे पर्यटन मंत्री जयकुमार रावल म्हणाले. रविवारी अष्टमीच्या मुहूर्तावर कोराडी येथे मंदिरात महाआरती आयोजित करण्यात आली होती. त्यात चित्रपट अभिनेत्री जुही चावला आणि मराठी अभिनेत्री निशीगंधा वाड यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.

अफवांवर विश्वास ठेऊ नका – मुख्यमंत्री

नागपूर : नाशिक जिल्ह्य़ातील तळेगाव येथे अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न झाल्याची घटना अतिशय दुदैवी आहे. या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली असून दोषींना कडक कारवाई व्हावी म्हणून पोलिसांना सूचना दिल्या आहेत. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नागपूर जिल्ह्य़ातील कामठी येथे  दिली. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी स्वत जाऊन पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. मुलीची प्रकृती चांगली आहे. या प्रकरणी समाजमाध्यमांतून निरनिराळ्या अफवा पसरविल्या जात आहेत. मात्र, त्या पूर्णत चुकीच्या आहेत. त्यावर विश्वास न ठेवता सर्वानी शांतता पाळून राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखावी, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.