अमरावती: महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत पत्नीचे नाव समाविष्ट न झाल्याच्या कारणावरून एका मद्यपी पतीने पत्नीला क्रूरपणे मारहाण केल्याची अत्यंत संतापजनक घटना अमरावती जिल्ह्यातील लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सारसी गावात घडली आहे. आधार कार्डवर पतीचे नाव नोंदणीकृत नसल्यामुळे पत्नीला योजनेचा लाभ मिळाला नाही, या क्षुल्लक कारणावरून पतीने क्रूरतेचा कळस गाठला. मारहाणीनंतर आरोपी पती आकाश रूपचंद भालेकर (२८, रा. सारसी) हा फरार झाला आहे. लोणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ हुकल्याने संताप

प्राथमिक माहितीनुसार, पीडितेचा आणि आरोपी आकाश भालेकरचा विवाह सुमारे दीड वर्षांपूर्वी झाला होता. लग्नानंतर पत्नीने नवीन आधार कार्ड काढण्यासाठी आणि त्यावर पतीचे नाव नोंदवण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केले, परंतु तांत्रिक अडचणींमुळे नवीन आधार कार्ड तयार झाले नाही. यामुळे तिला ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभासाठी नोंदणी करता आली नाही, ज्यामुळे ती दरमहा मिळणाऱ्या आर्थिक मदतीपासून वंचित राहिली. गावातील इतर महिलांना या योजनेचा लाभ मिळत असताना, पीडितेला मदत न मिळाल्याने आरोपी पती आकाश भालेकर वारंवार पत्नीवर संताप व्यक्त करत होता.

पट्ट्याने केली बेदम मारहाण; पत्नी गंभीर जखमी

आरोपी पती दारू पिऊन घरी परतला आणि त्याने पत्नीच्या योजनेत नाव समाविष्ट न होण्याच्या मुद्द्यावरून वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद विकोपाला गेला आणि संतप्त झालेल्या पतीने कंबरेचा चामड्याचा पट्टा काढून पत्नीला बेदम मारहाण केली. या अमानुष हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली. कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर पीडितेने लोणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
सामाजिक लाभाच्या योजनेतील किरकोळ तांत्रिक अडचणीवरून पतीने पत्नीवर हल्‍ला केला, पोलिसांनी आरोपी आकाश भालेकरचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत.

घराघरात भांडणे

लाडक्या बहिणीच्या पैशांचा हक्क आता घरातील एकाच लाभार्थी महिलेला मिळणार आहे. यासाठी शासनाने लाभार्थी महिलेला ‘या योजनेसाठी मी पात्र आहे’ (केवायसी) अशाप्रकारची कागदपत्रे स्थानिक तपासणी केंद्रात १८ नोव्हेंबरपर्यंत सादर करण्यास सांगितली आहेत. मागील दीड वर्षाच्या कालावधीत शहरांसह खेडेगावातील घरातील प्रत्येक महिलेने या योजनेचा लाभ घेतला. आता या योजनेचा लाभ घरातील एकच महिलेला मिळणार आहे. ग्रामीण भागांमध्ये घराघरांमध्ये लाडक्या बहिणीच्या पैशाचा लाभ मीच घेणार, या विषयांवरून सासू, सुना आणि जावांमध्ये भांडणे सुरू आहेत.