अमरावती : काँग्रेसतर्फे रिपब्लि‍कन पक्षाला सातत्‍याने सापत्‍न वागणूक मिळत असून काँग्रेसने आतापर्यंत केवळ फुले-शाहू-आंबेडकरांच्या नावाचा वापर केला; परंतु प्रत्यक्षात त्यांची विचारधारा रुजविण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाही. काँग्रेसकडून दलित व मुस्लिमांचा केवळ राजकीय फायद्यासाठी वापर केला जातो. त्यामुळे काँग्रेसची मस्ती जिरविण्यासाठी आपण भाजपासोबतही जाऊ शकतो, असा दावा रिपाइं गवई गटाचे राष्‍ट्रीय महासचिव डॉ. राजेंद्र गवई यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला.

डॉ. गवई म्‍हणाले की, नुकतीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व इतर काही नेत्‍यां सोबत आपली भेट झाली आहे. त्यांनी रिपाइंला सोबत घेण्यावरून सकारात्मकता दर्शविली आहे. भाजप आम्हाला सोबत घेण्यास तयार आहे. परंतु आपणास मागच्या दाराने विधानपरिषद अथवा राज्यसभेत जायचे नाही, ही बाब आपण त्यांना स्पष्टपणे सांगितली आहे. त्यामुळे भाजपसोबत रिपाइंची युती झाल्यास आपण लोकांमध्ये जाऊन निवडणूक लढविणार आहे. परंतु चिन्ह मात्र रिपाइंचेच असणार आहे, ही अट आपण मांडली आहे. तूर्तास ही केवळ चर्चा आहे. यावर आपण अद्याप निर्णय घेतला नाही.

हेही वाचा : नागपूर : विदर्भातील अग्निवीर सैन्य भरतीला सुरुवात

आपण काँग्रेसच्या निर्णयाची प्रतिक्षा करीत आहेत. काँग्रेसने आपणास साद दिल्यास प्रतिसाद दिला जाणार आहे. परंतु गेल्या वेळीप्रमाणे यावेळी देखील त्यांनी आम्हास दुर्लक्षित केल्यास आम्ही गप्प बसणार नाही. काँग्रेसने परंपरागत मैत्री कायम राखावी आम्ही देखील त्यांना साथ देऊ असे गवई म्हणाले. काँग्रेस व भाजप असे दोन पर्याय आमच्यापुढे आहेत. ज्यांना होकार दिला त्यांच्यासोबत आम्ही जाणार, असेही यावेळी डॉ. राजेंद्र गवई म्हणाले.
आमदार यशोमती ठाकूर यांनी आपण पंजावर निवडणूक लढावी यासाठी आग्रही होत्या. त्यांनी सातत्याने आपल्याविरोधात भूमिका घेतली आहे. सत्ता असताना त्या वेगळ्या भूमिकेत होत्या. सत्ता नेहमी नसते. यशोमती ठाकूर पुढे रिपाइं व आमच्या विचारांविरोधात असतील तर त्यांच्या तिवसा विधानसभा मतदार संघातून आपण निवडणूक लढणार असल्याचेही डॉ. गवई यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : धान उत्पादकांना बोनसची प्रतीक्षाच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापूर्वी रा.सू. गवई यांनी सुद्धा काँग्रेसला पराभूत करण्‍यासाठी प्रयत्न केले होते. कमलताई गवई तत्कालीन जनसंघ व आताच्या भाजपच्या मदतीने निवडणूक लढल्‍या होत्‍या. त्यामुळे आता आपण भाजपासोबत जाण्यात गैर काय, असा प्रश्नही डॉ. गवई यांनी उपस्थित केला. पत्रपरिषदेत विष्णू कुऱ्हाडे, ए.सीख़ंडारे, प्रवीण डोंगरदिवे, अनिल गवई, अतिश डोंगरे आदी उपस्थित होते.