अमरावती : जनतेने मशाल या पक्षचिन्हाचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले आहे. हे चिन्ह आता घराघरात पोहचले आहे. या मशालीच्या आगीत सारे गद्दार भस्मसात होतील. या गद्दारांना लोकच धडा शिकवतील, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटावर केली आहे.
हेही वाचा : विश्लेषण : जिथे कमी तिथे मोदी? भाजपची लोकसभेसाठी काय आहे रणनीती?
हेही वाचा : विश्लेषण : साजिद खानमुळे पुन्हा चर्चेत आलेली MeToo मोहीम नक्की आहे तरी काय? जाणून घ्या
अंबादास दानवे हे सध्या मेळघाटच्या दौ-यावर असून त्यांनी आज मेळघाटातील धारणी येथे कुपोषण आणि बालमृत्यूंचा आढावा घेतला. त्यांनी काही कुपोषित बालकांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांशी चर्चा देखील केली. त्यानंतर दानवे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. अंबादास दानवे म्हणाले, शिवसेना कुणीही संपवू शकत नाही. पक्षचिन्ह गोठवले म्हणजे पक्ष संपत नसतो. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना तेजाने तळपतच राहणार आहे. मशाल हे चिन्ह आताच घरोघरी पोहचले आहे. आमची चिंता विरोधकांनी करू नये, लोकच आता या गद्दारांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत.
हेही वाचा : नागपूर : मंदिरात दर्शन घेत माफी मागितली आणि हनुमानाची गदा घेऊन पसारही झाला
दानवे म्हणाले, कुपोषणाचा विषय गंभीर आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात कुपोषणाला आळा घालण्यासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले होते. प्रशासकीय यंत्रणेने ठरवले, तर या भागात उत्तम काम होऊ शकते. प्रशासकीय यंत्रणा प्रतिसाद देत नाहीत, अशा आदिवासी बांधवांच्या तक्रारी आहेत, त्या दूर झाल्या पाहिजेत, असेही अंबादास दानवे म्हणाले.