चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये तथा जिल्ह्यातील जंगल व जंगला लगतच्या शेतातील उघड्या विहिरी वाघ आणि बिबट्यासाठी जीवघेण्या ठरत आहे. मंगळवारी अशाच प्रकारे ताडोबा बफर झोन मध्ये भादुर्णा गावातील विहिरीत बिबट्याचे पिल्लू पडले. ताडोबा रेस्क्यू पथकाने अथक परिश्रम करून या बिबट्याच्या पिल्लाचे प्राण वाचविले. त्यानंतर या पिल्लाला जंगलात मुक्त करण्यात आले.
ताडोबा तसेच जिल्ह्यातील जंगलात शेतीसाठी तसेच शेतकऱ्यांसाठी पाण्याचा आणि आधार प्रणालीचा मुख्य स्रोत म्हणून विहिरी खोदण्यात आलेल्या आहेत. परंतु या विहिरी अनेकदा त्या भागातील वन्यजीवांसाठी काही दुःखद बातम्या घेऊन येतात. उघड्या विहिरी, कोरड्या विहिरी असोत किंवा पाण्याने भरलेल्या विहिरी असोत या प्राण्यांसाठी घातक ठरल्या आहेत. ताडोबा बफर झोनमध्ये मूल तालुक्यातील भादुर्णा गावातील एका विहिरीत अशाच प्रकारे बिबट्याचे पिल्लू पडले. विहीर ज्याचे शेतात hitu त्या शेतकऱ्याने २९ एप्रिल २०२५ रोजी सकाळी मूल बफर चे वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल कारेकर, यांना या घटनेची माहिती दिली. एका मादी बिबट्याचे पिल्लू अत्यंत त्रासदायक परिस्थितीत विहिरीत पडले आहे. तेव्हा पथकाला पाठवा असेही सांगितले.
रात्रीच्या वेळी किंवा पहाटेच्या वेळी बिबट्याचे पिल्लू अनपेक्षितपणे ४० फूट खोल आणि पाण्याने भरलेल्या विहिरीत पडले असल्यामुळे त्याचा जीव वाचविणे कठीण होते. विशेष म्हणजे बिबट्याचे पिल्लू खोल विहिरीत पाण्यावर तरंगत राहण्यासाठी धडपडत होता. ताडोबाची रॅपिड रेस्क्यू टीम तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर विहिरीत दिलेल्या एका खाटेच्या मदतीने पिल्लाला आधार देण्यात आला. आधार मिळाल्याने पिल्लू तरंगत राहण्यात यशस्वी झाले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे आणि रॅपिड रेस्क्यू टीम, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, आणि त्यांच्या टीमने कॅच पोलच्या मदतीने बिबट्याच्या पिल्लाला सुरक्षितपणे बाहेर काढले आणि डॉ. रविकांत खोब्रागडे यांनी केलेल्या वैद्यकीय तपासणीनंतर, बिबट्याच्या पिल्लाला जंगलात सोडण्यात आले. या कार्यात ताडोबा रॅपिड रेस्क्यू टीम सदस्य – अजय मराठे, योगेश लकडे, प्रफुल्ल वाटगुरे, गुरुनानक ढोरे, विकास ताजणे, दिपेश टेंभुर्णे, वसीम शेख,अमोल कोरपे, अक्षय दांडेकर आणि मुल बफर रेंजचे सर्व फील्ड स्टाफ कार्यरत होते. हे बचाव कार्य ताडोबाचे क्षेत्र संचालक आणि वनसंरक्षक डॉ. प्रभुनाथ शुक्ला आणि ताडोबा बफरचे उपसंचालक लेफ्टनंट कुशाग्र पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.