नागपूर : राज्यात वन्यप्राण्यांच्या जेरबंदीचे प्रमाण वाढले आहे.मानव-वन्यजीव संघर्ष वाढत चालला आहे तसा हा जेरबंदीचा आकडासुद्धा वाढत आहे. एकदा का वन्यप्राणी जेरबंद झाला की त्याच्या सुटकेची शक्यता कमीच. त्यामुळेच सुटकेचे प्रमाण हे अत्यल्प आहे. राज्यातील “ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर” ने मात्र हा पायंडा मोडीत काढला आहे. येथे येणारा प्राणी मानव-वन्यजीव संघर्षातील असेल किंवा जखमी झालेला, त्याला त्याचा मूळ अधिवास परत मिळवून देणे हे हेच या सेंटरचे उद्दिष्ट आहे. म्हणूनच तब्बल दोन महिन्यांच्या उपचारानंतर बिबट्याला त्यांनी त्याचा नैसर्गिक अधिवास परत मिळवून दिला.
पारशिवनीजवळील एका शेतातील टाक्यात दोन महिन्यापूर्वी एक बिबट पडला. टाक्यात पडल्याने या बिबट्याला जखमा झाल्या होत्या. तब्बल दोन महिन्यांच्या यशस्वी उपचारानंतर बिबट बरा झाला. या बिबट्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. जंगलालगतच्या शेतातील उघड्या विहीरी, पाण्याचे टाके वन्यप्राण्यांसाठी धोकादायक ठरत आहेत. प्रामुख्याने उन्हाळ्यात वन्यप्राणी यात पडण्याचे प्रमाण वाढले आहे. पारशिवनीजवळील एका शेतातील टाक्यात १८ मार्चला एक बिबट पडला. शेतमालकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ही माहिती वनविभागाला दिली.
पारशिवनीजवळील एका शेतातील टाक्यात १८ मार्चला एक बिबट पडला.शेतमालकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ही माहिती वनविभागाला दिली. परिस्थिती पाहिल्यानंतर वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी सेमिनरी हिल्सवरील ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्राला ही माहिती दिली. केंद्राचे बचाव पथक तातडीने घटनास्थळी… pic.twitter.com/VZytaV2pJ1
— LoksattaLive (@LoksattaLive) May 13, 2025
वनखात्याचे अधिकारी घटनास्थळी पोहचले. परिस्थिती पाहिल्यानंतर वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी सेमिनरी हिल्सवरील ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्राला ही माहिती दिली. केंद्राचे बचाव पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. पाण्यात वन्यप्राण्याला बेशुद्ध करता येत नाही. अशावेळी जोखीम स्वीकारून या बचाव पथकाने अवघ्या आठ मिनिटात त्या बिबटयाला बाहेर काढले. पाण्यात बराचवेळ राहिल्यामुळे बिबट्याच्या तळपायाला जखमा झाल्या होत्या. त्याला धावणे, चालणे तर दूरच पण पायावर देखील नीट उभे राहता येत नव्हते. केंद्रातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याच्यावर उपचार सुरू केले. दीड ते दोन महिन्याच्या उपचारानंतर बिबट पूर्णपणे ठीक झाला. उभा राहू न शकणारा बिबट चालायला, धावायला लागला होता. तो पूर्णपणे बरा झाल्याची खात्री पटल्यानंतर ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरच्या चमूने त्याला त्याच्या मूळ अधिवासात परत पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रविवारी रात्री त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमधून या आधी देखील उपचारांनंतर शेकडो वन्यप्राणी आणि पक्ष्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात परत पाठवण्यात आले आहे.