नागपुरातील गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका १८ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. घरात कुणी नसताना तिने सिलिंग फॅनला दोरी बांधून आयुष्याचा शेवट केला. ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. तरुणीच्या आत्महत्येचं नेमकं कारण सुसाईड नोटमधून समोर आलं आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, मृत विद्यार्थिनी ही नागपूरमधील एका नामांकित महाविद्यालयात कला शाखेच्या दुसऱ्या वर्षात शिकत होती. तर तिचे वडील केंद्र सरकारमध्ये नोकरीला होती. तिने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये ती लेस्बियन (समलैंगिक) असल्याचं नमूद केलं आहे. एका मुलाबरोबर लग्न करून सुखी जीवन जगणं तिला शक्य नसल्याचंही तिने म्हटलं आहे. मनाविरुद्ध जगण्यापेक्षा आत्महत्या करून जीवन संपवणं माझ्यासाठी आनंदाची गोष्ट असेल, असंही तिने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.

आत्महत्येची ही घटना उघडकीस येताच शहरात खळबळ उडाली आहे. तसेच समलिंगी समुदायातील लोकांनाही याचा धक्का बसला आहे. अशाप्रकारे एखाद्या समलैंगिक तरुणीने आत्महत्या केल्याची ही नागपूर शहरातील वर्षभरातील दुसरी घटना आहे. मार्चमध्ये, एका तृतीयपंथी व्यक्तीने आपल्या मैत्रिणीला मुलाशी लग्न करण्यापासून रोखल्याने तिने विष पिऊन आत्महत्या केली होती.

हेही वाचा- ऐश्वर्या शॉपिंग करत होती अन्…; भारतीय तरुणीचा अमेरिकेत मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या ताज्या घटनेबाबत अधिक माहिती देताना गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक नितीन विठोले यांनी सांगितलं की, आपण समलैंगिक (लेस्बियन) असल्याचं कळाल्यानंतर पीडित मुलीने याबाबतची माहिती आपल्या आई-वडिलांना दिली. पण आई-वडिलांनी तिला पाठिंबा दिला नाही. तसेच तिने मुलाबरोबर लग्न करावं, यासाठी तिच्यावर दबाव टाकण्यात आला. यामुळे पीडित तरुणी नैराश्यात गेली. यातूनच तिने रविवारी घरात कुणी नसताना सिलिंग फॅनला दोरी बांधून आत्महत्या केली.