देवेंद्र गावंडे

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना झालेय तरी काय? देशात शक्तिशाली असलेल्या भाजपसमोर आव्हान उभे करण्यासाठी एकेक जागा महत्त्वाची असताना त्यांनी भंडारा लोकसभेच्या रिंगणातून पळ काढण्याचे कारण काय? कर्णधारच पळपुटा निघाल्यावर मग संघातील इतर सहकाऱ्यांनी आशेने बघायचे तरी कुणाकडे? राज्यात भाजपविरुद्ध लढण्याची ताकद फक्त नानांमध्ये या आजवर श्रेष्ठींकडून पसरवल्या गेलेल्या गृहीतकाचे आता काय? ऐन मोक्याच्या क्षणी रिंगणातून माघार घेणे ही विरोधकांशी केलेली हातमिळवणीच असा तर्क कुणी काढला तर त्यात चूक काय? राज्याच्या राजकारणात राहिलो तर भविष्यात मुख्यमंत्री होऊ या स्वप्नातून हे घडले असे समजायचे काय? देशभरातील सर्वच प्रमुख नेत्यांनी लोकसभेच्या रिंगणात उतरायचे असे धोरण खुद्द पक्षाने आखले असताना त्याला छेद देण्याची हिंमत नानांनी कशाच्या बळावर केली असेल? पक्ष अडचणीत असताना अशी कमजोर उमेदवार उतरवण्याची कृती करून आपण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतोय हे त्यांच्या लक्षात आले नसेल का? स्वत: लढायचे नव्हते तर सेवक वाघाये, मित्रपक्षाचे मधुकर कुकडे यासारखे अनेक उमेदवार असताना त्यांना डावलून प्रशांत पडोळे या काँग्रेसचा साधा सदस्यही नसलेल्या व्यक्तीला उमेदवारी देण्याचे कारण काय? याच पडोळेंना २०१४च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार म्हणून केवळ दोन हजार मते मिळाली हे नाना विसरले असतील काय? साकोली विधानसभेत अनामत जप्त झालेली व्यक्ती लोकसभेचा उमदेवार कशी होऊ शकते? कुणाशी केलेल्या तडजोडीतून हे घडले असेल? यासारखे असंख्य प्रश्न सध्या काँग्रेसच्या वर्तुळात चर्चेत आहेत.

हेही वाचा >>> “मी रडणार नाही, तर लढणार,” प्रतिभा धानोरकर यांचे शक्तिप्रदर्शन; उमेदवारी अर्ज दाखल

पक्षाचा जनाधार जेव्हा घटतो तेव्हा त्यात भर घालण्यासाठी व कार्यकर्त्यांना उभारी देण्यासाठी प्रमुख नेत्यांनी प्रत्येक निवडणुकीच्या रिंगणात उतरायचे ही सर्वमान्य पद्धत. देशात भाजपच्या जवळ जेव्हा जनाधार नव्हता तेव्हा त्या पक्षातील नेत्यांनी याचाच अवलंब केला. वाजपेयी, अडवाणी व ठिकठिकाणचे नेते प्रत्येकवेळी रिंगणात असायचे व अनेकदा पराभव स्वीकारायचे. या घुसळणीतून पक्ष हळूहळू वाढत गेला. आज तीच वेळ काँग्रेसवर ओढवलेली. सर्वसामान्यांच्या भाषेत या पक्षाचे जहाज डुबण्याच्या स्थितीत आलेले. अशावेळी त्यावर हजर असलेल्या प्रत्येकाने जहाजाला सुस्थितीत आणणे हे कर्तव्य. ते पार पाडायचे सोडून प्रत्येकजण पाण्यात उडी मारू लागला तर जहाजाचे तळाशी जाणे ठरलेले. अशास्थितीत ज्याच्यावर भिस्त व मदार आहे त्यानेच पळ काढणे कुणालाही पटणारे नाही. नानांनी नेमके हेच केले. त्यांनी दिलेल्या उमेदवाराचा दारुण पराभव झाला तर नाना गृहजिल्ह्यातूनच उखडले जातील. ज्याला स्वत:च्या जिल्ह्यावर वर्चस्व राखता येत नाही तो राज्याचा नेता कसा, असा प्रश्नही उपस्थित होईल. त्यावेळी नाना नेमकी काय भूमिका घेणार? विरोधकांचा विजय सहजसोपा करण्याची कृती थेट प्रदेशाध्यक्षांच्या हातून घडणे हे अतिच झाले. त्यामुळे अख्खा पक्षच या घडामोडीने अवाक् झालेला. नानांकडून ही चूक पहिल्यांदाच घडली असेही नाही. याआधी त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात चंद्रशेखर बावनकुळेंविरुद्ध छोटू भोयर नावाचे उमेदवार असेच शोधून आणले होते. हे भोयर भाजपचे. ते अशा निवडणुकीत होणाऱ्या अर्थकारणाला पुरून उरतील असा नानांचा दावा होता. त्यामुळे तेव्हा इच्छा असूनही प्रफुल्ल गुडधेंना उमेदवारी नाकारली गेली. प्रत्यक्षात अर्ज भरल्यावर हे भोयर जे बेपत्ता झाले ते अखेरपर्यंत कुणाला दिसलेच नाहीत. शेवटी काँग्रेसच्या मतदारांवर अपक्ष उमेदवाराला मत देण्याची पाळी आली. या प्रकरणात नानांना चांगलेच तोंडघशी पडावे लागले. तरीही राहुल गांधींच्या आशीर्वादामुळे ते पदावर कायम राहिले. नंतर शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीच्या वेळी सुद्धा त्यांनी असाच आपटीबार मारायचा प्रयत्न सुरू केला. शिक्षक भारतीच्या झाडेंना ते उमेदवारी देऊ इच्छित होते. हे लक्षात येताच विजय वडेट्टीवार व सुनील केदार यांनी अडबालेंची उमेदवारीच जाहीर करून टाकली. त्यामुळे नानांचा हा बार फुसका ठरला.

शेवटी निवडून आले ते अडबालेच. त्यामुळे पराभवाची नामुष्की टळली. या दोन्ही उदाहरणातून नानांनी कोणताही धडा घेतला नसल्याचे आता पुन्हा दिसले. आता प्रश्न असा उपस्थित होतो की काँग्रेसचे श्रेष्ठी हे खपवून कसे घेतात? हे श्रेष्ठी नामक प्रकरण इतक्या आंधळेपणाने वागू कसे शकते? यावेळी नानांनी केलेली चूक भंडारा-गोंदियापुरती मर्यादित असल्याने पक्षातील इतर नेते त्यावर काहीच बोलू शकले नाहीत. ही चूक करताना कुणाचीही आडकाठी येणार नाही हे ठाऊक असल्यामुळे नाना असे वागले असतील का? अवघ्या दोन दिवसाच्या अंतराने नानांनी केलेली ही एकमेव चूक नाही. त्यांनी अकोला पश्चिममध्ये होणाऱ्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत सुद्धा दुसरी चूक केली. तिथे पक्षाने दिलेल्या उमेदवारावर दंगलीचे गुन्हे आहेत. त्याला प्रशासनाने तडीपारीची नोटीस सुद्धा बजावलेली. अलीकडे सातत्याने होत असलेल्या धार्मिक दंगलीत अल्पसंख्याकांनाच दोषी ठरवण्याची पद्धत रूढ झालेली. त्यामुळे काँग्रेसने उमेदवारी दिलेली व्यक्ती पूर्णपणे दोषी असेलच असे नाही. मात्र असे दोषाचे डाग अंगावर चिटकलेल्यांना दूर ठेवणे केव्हाही योग्य असते. सध्याच्या उन्मादी वातावरणात सावध चाली खेळणे केव्हाही महत्त्वाचे. त्याकडे दुर्लक्ष करत नानांनी उमेदवारी बहाल करून टाकली. त्यावरून पक्षाला ‘भारत तोडो’ सारख्या जहरी टीकेला सामोरे जावे लागले. पक्षांतर्गत रोष उफाळून आला तो वेगळाच. आता ती पोटनिवडणूक रद्द झाल्याने नानांची नामुष्की टळली. मग प्रश्न असा उरतो की नाना वारंवार असे का वागतात? भाजपला अंगावर घेण्याची हिंमत केवळ आपल्यात अशी प्रतिमा एकीकडे निर्माण करायची. ती टिकून राहावी यासाठी माध्यमातून भाजपवर जहरी टीका करायची. त्यातून मिळणारी वाहवा स्वीकारायची व दुसरीकडे प्रत्यक्ष लढण्याची वेळ आली की मैदान सोडून पळायचे यात कसला आलाय शहाणपणा? नानांकडून विरोधकांवर डागले जाणारे टीकेचे बाण केवळ शाब्दिक, त्याला कृतीची जोड नाही असा अर्थ यातून कुणी काढला तर त्यात चूक काय? मग नानांचा खरा चेहरा कोणता? टीकाकाराचा की पलायनवादाचा पुरस्कार करणाऱ्या तडजोडीकाराचा? आजच्या घडीला भाजप काँग्रेसमधील एकेक मोहरा टिपण्यासाठी सज्ज आहे. अशावेळी पक्षात आश्वासक वातावरण असावे, प्रत्येकात लढण्याची जिद्द निर्माण व्हावी, सध्याच्या कठीण काळात विरोधकांशी दोन हात करण्याची प्रेरणा मिळावी, कमजोर असलो तरी काय झाले? जिद्दीने लढू व पक्ष टिकवू अशी भावना निर्माण व्हावी यासाठी नेत्याने आघाडीवर राहून नेतृत्व करणे गरजेचे. नेमके त्याच काळात नानांचे हे कच खाणे पक्षातील साऱ्यांना निराश करणारे. यातून कुणाचा पक्ष सोडण्याचा विचार बळावलाच तर त्याला दोष देता येणार नाही. अशी स्थिती नानांना पक्षात आणायची आहे का? ती उद्भवली तर नानांचे स्वप्न कसे साकार होईल? एकूणच त्यांच्या या कृतीने साऱ्यांना बुचकाळ्यात टाकले हे मात्र खरे!