चंद्रपूर: माझ्यावर, माझ्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. दुःख बाजूला सारून मी मतदारसंघ पिंजून काढला. अशात एखाद्यावेळी डोळे दाटून आले तर त्याचेही तुम्ही भांडवल करता. तुम्ही केलेल्या वक्तव्यातून तुमची असंवेदनशीलता दिसली. एका विधवेच्या अश्रूचा तुम्ही अनादर केला. माता-भगिनी तुम्हाला माफ करणार नाही. आता मी रडणार नाही, तर लढणार, अशा शब्दात काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना प्रत्युत्तर दिले.

चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार धानोरकर यांनी बुधवारी आपला दुसरा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भव्य मिरवणूक काढत शक्तीप्रदर्शन करण्यात आले. यानंतर न्यू इंग्लिश पटांगणावर निर्धार सभा पार पडली. सभेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे, आमदार सुधाकर अडबाले, आमदार अभिजीत वंजारी, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी आमदार वामनराव कासावार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिन्हे, आपचे सुनील मुसळे, मयुर राईकवार, राष्ट्रवादीचे राजेंद्र वैद्य, दीपक जयस्वाल, माजी आमदार देवराव भांडेकर, शहर काँग्रेस अध्यक्ष रामू तिवारी उपस्थित होते. 

हेही वाचा >>>‘ईव्हीएम’ऐवजी ‘बॅलेट पेपर’वर मतदान घेतल्यास निवडणूक ड्युटी करतो! प्राध्यापकाच्या व्हायरल पत्राची समाजमाध्यमांमध्ये चर्चा 

मुनगंटीवार यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करताना धानोरकर यांच्यावर टीका केली होती. त्याला आज धानोरकर यांनी उत्तर दिले. ही लढाई हुकूमशाहीविरोधात लोकशाहीची आहे. या लढाईत तुमच्यातला प्रत्येकजण शूर शिपाई आहे, असे धानोरकर म्हणाल्या. याप्रसंगी धोटे यांच्यासह इतरही मान्यवरांची भाषणे झाली. आमदार धानोरकर यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आज पुन्हा त्यांनी शक्तीप्रदर्शन करीत दुसरा उमेदवारी अर्ज दाखल केला. मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी हजारोंच्या संख्येत नागरिक एकत्र आले होते. कोहीनूर क्रीडांगण, गिरणार चौक, गांधी चौक या प्रमुख मार्गांने मार्गक्रमण करीत मिरवणूक जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोलची.

हेही वाचा >>>राणा दाम्‍पत्‍याची चहूबाजूंनी कोंडी, महायुतीतून आव्‍हान, भाजपमधूनही विरोध

वडेट्टीवार यांची अनुपस्थिती चर्चेत

धानोरकर उमेदवारी अर्ज दाखल करीत असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार अनुपस्थित होते. ते गडचिरोलीचे काँग्रेसचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांचा उमेदवारी अर्ज भरण्यास जाणार असल्याने चंद्रपूरला येणार नाही, हे सकाळीच स्पष्ट झाले. दुसरीकडे, मागील काही दिवसांपासून वडेट्टीवार व आमदार धानोरकर यांच्यात उमेदवारीवरून धुसफूस सुरू होती. विशेष म्हणजे, दोघांनी एकमेकांवर टोकाची टीका केली. परिणामी वडेट्टीवार चंद्रपूरला आलेच नाही. दरम्यान, वडेट्टीवारांचे काही समर्थक आजच्या मिरवणुकीत सहभागी झाले होते.

‘वंचित’कडून राजेश बेलेंचे नामाकंन

वंचित बहुजन आघाडीकडून संजिवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. बेले यांनी गांधी चौकातून मिरवणूक काढत जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. वंचितच्या ‘एन्ट्री’मुळे चंद्रपुरात तिहेरी लढत होणार, हे स्पष्ट झाले आहे.