scorecardresearch

लोकजागर : पदयात्रा संपली, पुढे…?

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा विदर्भातून रवाना होऊन आता पंधरवडा लोटला. एक दोन घटनांचा अपवाद वगळला तर वैदर्भीय काँग्रेसमध्ये पुन्हा कमालीची शांतता पसरलेली.

लोकजागर : पदयात्रा संपली, पुढे…?
लोकसत्ता ग्राफिक्स टीम

देवेंद्र गावंडे

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा विदर्भातून रवाना होऊन आता पंधरवडा लोटला. एक दोन घटनांचा अपवाद वगळला तर वैदर्भीय काँग्रेसमध्ये पुन्हा कमालीची शांतता पसरलेली. जे नेते यात्रेत गेले, राहुल गांधींच्या वेगात वेग मिसळून चालले त्यातले बरेच मिठाच्या पाण्यात पाय टाकून बसलेले. ते करणार तरी काय म्हणा? प्रस्थापितपणाच्या नादात या साऱ्यांची चालण्याची सवयच तुटून गेलेली. ही यात्रा निघाली म्हणून त्यांना चालावे लागले. पक्षात आलेली मरगळ दूर व्हावी हाही या यात्रेचा एक उद्देश. ती किती प्रमाणात दूर झाली याचे उत्तर सध्यातरी सापडणे कठीण. या यात्रेने कार्यकर्त्यांमध्ये मात्र जोश निर्माण केला. तो दिसूनही आला पण पुढे काय? या जोश व ऊर्जेला योग्यप्रकारे वळण देण्याचे काम नेत्यांचे. ते अजूनही पाण्यातले पाय बाहेर काढायला तयार नाहीत. आपला नेता एवढा फिरतोय, तेव्हा आतातरी कामाला लागावे अशी भावनाच यांच्यात दिसत नाही. आधी हे सारे गांधी घराण्याच्या करिष्म्यावर अवलंबून होते, आता राहुल गांधींच्या मेहनतीवर. शिवाय गटबाजी, घराणेशाहीची बाधा व एकमेकांचे पाय ओढण्याची वृत्ती आहेच साऱ्यांत ठासून भरलेली. यात्रेतही त्याचे दर्शन झालेच.

वाशीम, बुलढाणा व अकोला या तीन जिल्ह्यातून यात्रा गेली. पश्चिम वऱ्हाडातल्या या मोठ्या पट्ट्यात पक्षाचे आमदार केवळ दोन. त्यातले अमित झनक हेच काय ते साऱ्यांच्या ओळखीचे. त्यामुळे यात्रेच्या आयोजनाची जबाबदारी कुणावर सोपवायची हा ‘टीम राहुल’ समोरचा यक्षप्रश्न. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विदर्भातले पण त्यांचे एकाही वैदर्भीय नेत्याशी पटत नाही. हे लक्षात आल्याने अखेर बाळासाहेब थोरातांवर जबाबदारी देण्यात आली. त्यांच्या मदतीला होते यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार, सुनील केदार व नितीन राऊत हे माजी मंत्री. त्यामुळे पटोलेंना यात्रेत राहुलसोबत चालण्याचेच काम उरले होते. थोरातांनी उत्तम कामगिरी बजावली पण त्यातही खोडा घालण्याचे प्रयत्न झालेच. यात्रेने विदर्भात प्रवेश करताच आदिवासी नेते बिरसा मुंडा यांच्या जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्याचे ठरले. तो होऊ नये यासाठी प्रदेश पातळीवरचे नेतेच सक्रिय होते. यामुळे याची जबाबदारी असलेले शिवाजीराव मोघे कमालीचे नाराज झाले. अखेर टीम राहुलने यात हस्तक्षेप केल्यावर हा वाद मिटला. पक्षाची सध्याची अवस्था काय? वेळ कोणती? याचे कसलेही भान न ठेवता काडी घालण्याचे काम या पक्षाचे नेते उत्तमपणे करू शकतात हेच यातून दिसले. अकोला जिल्ह्यातील बाळापूर परिसराची जबाबदारी तेथील नेते खतीब यांच्याकडे होती. ते तयारीत व्यस्त असताना त्यांच्या एका समर्थकाला ‘ब्लॉक’ अध्यक्षपदावरून प्रदेश काँग्रेसने हटवले. त्यामुळे ते कमालीचे दुखावले. यात्रा असफल करण्याची सुपारी प्रदेशाने घेतली काय? असा त्यांचा सवाल होता. यातही वरिष्ठांना हस्तक्षेप करावा लागला. अखेर हा निर्णय मागे घेतल्यावर खतीब कामाला लागले.

राहुल गांधींनी कितीही मेहनत केली तरी या पक्षाचे नेते काडीबाजपणा सोडत नाही हेच यातून दिसले. शेगावच्या जाहीर सभेत सोनिया गांधी येणार असे वृत्त नाना पटोलेंच्या हवाल्याने प्रसिद्ध झाले. प्रत्यक्षात असे काहीच ठरलेले नव्हते. अशोक चव्हाणांनी नांदेडमध्ये खरगेंना बोलावले, त्याला शह देण्यासाठी सोनियांचे नाव समोर करण्यात आले. हा प्रकार बघून टीम राहुल कमालीची संतापली. अखेर प्रदेश काँग्रेसला स्पष्टीकरण द्यावे लागले. अशोक चव्हाणांकडे नांदेडची जबाबदारी होती. तसे ते राज्यभर जनाधार असलेले नेते. मात्र ते विदर्भात आलेच नाहीत. गेली काही महिने ते व विजय वडेट्टीवार भाजपत जाणार अशा वावड्या मुद्दामहून उठवण्यात आल्या. याचाच आधार घेत दिल्लीत जाऊन श्रेष्ठींचे कान भरण्यात आले. हे करण्यात प्रदेश पातळीवरचे कोण आघाडीवर होते हे सर्वज्ञात. या पार्श्वभूमीवर चव्हाणांनी यात्रेची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडूनही विदर्भात न येणेच पसंत केले. सध्या हा पक्ष ‘करो या मरो’ अशा अवस्थेतून जातोय. त्यातून बाहेर पडण्यासाठी राहुल गांधी जीव तोडून मेहनत घेत असताना सुद्धा प्रदेश पातळीवरचे नेते दुरुस्त व्हायला तयार नाहीत हेच यातून दिसले. ही यात्रा यशस्वी करण्यात मोठा सहभाग असलेले थोरात पूर्ण काळ पडद्याआड राहिले. त्यांनी स्वत:ला मिरवून घेतले नाही. हा त्यांच्यातला गुण इतर नेत्यांमध्ये कधी येणार? विदर्भातील अनेक नेते तर काही न करता मिरवता कसे येईल हेच बघत होते. अनेक नेत्यांनी यात्रेत स्वत:च्या मुलांना समोर करण्याचा प्रयत्न अगदी उघडपणे केला. ज्यांच्याकडून चालणे होत नव्हते असे नेतेही त्यांच्या मुलांना राहुल गांधींच्या ‘डी’ मध्ये कसे घुसवता येईल यासाठी धडपडत होते. या मुलांना एकदा का नेत्यासोबत चालायला मिळाले की झाले धन्य अशीच या साऱ्यांची भावना. अशा वृत्तीने पक्षाला खरेच ऊर्जितावस्था येईल का? स्वत:च्या अथवा मुलांच्या चित्रफिती समाजमाध्यमावर टाकल्याने पक्ष वाढेल का? आज पंधरा दिवस लोटले तरी याच चित्रफितींचा सर्वत्र सुळसुळाट दिसतो. म्हणजे यात्रा आली व समोर गेली तरी पक्षनेत्यांच्या वृत्तीत काडीचाही बदल झाला नाही.

हे असेच सुरू राहिले तर राहुल गांधींनी एक नाही दहा यात्रा काढल्या तरी पक्षाच्या स्थितीत अजिबात सुधारणा होणार नाही. यात्रा अकोला जिल्ह्यात असताना एका आडवळणाच्या गावात पन्नास हजार लोक जमलेले. तिथे कुठलीही सभा नव्हती तरी लोक उत्स्फूर्तपणे एकत्र आले. अशा प्रसंगाला प्रसिद्धी मिळावी असे अजूनही या पक्षातल्या नेत्यांना वाटत नसेल व ते फक्त स्वत:चा उदोउदो करण्यात व्यस्त असतील तर या पक्षाचे काही खरे नाही. पक्षाचे बहुसंख्य नेते अजूनही ‘लोक भाजपला कंटाळतील व आपल्याकडे वळतील’ याच मानसिकतेत वावरतात. ठराविक काळानंतर लोक सत्तारूढांना कंटाळतात व नवा पर्याय शोधतात हे खरे असले तरी प्रत्येकवेळी तसे घडेलच असे नाही. सत्ता टिकवण्यात तरबेज झालेल्या भाजपला सुद्धा लोकांच्या या मनोवस्थेची पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे त्यांना गुंतवून कसे ठेवायचे? ते कंटाळणार नाहीत, नाराज होणार नाहीत यासाठी काय करायचे? कुठे नेता बदलायचा? याची चांगली जाण भाजपने आत्मसात केलेली. त्यादृष्टीने त्यांची पावलेही पडत असतात. हे सत्य अजून काँग्रेसनेत्यांच्या गळी उतरलेले दिसत नाही. त्यामुळे ऐतिहासिक ठरावी अशी यात्रा विदर्भातून जाऊन सुद्धा पक्षातली शांतता कायम. किमान यानिमित्ताने तरी सत्तेशी लढण्याची वृत्ती पक्षातील नेते व कार्यकर्ते आत्मसात करतील ही टीम राहुलची अपेक्षा जर पूर्णच होणार नसेल तर यात्रेचा काहीही उपयोग होणार नाही. या निमित्ताने का होईना पण स्वत:मध्ये बदल घडवून आणावा असे पक्षाच्या नेत्यांना वाटायला हवे. आतातरी गटबाजी, घराणेशाहीच्या रोगापासून अलिप्त राहावे अशी भावना तयार व्हायला हवी. तेच यात्रेचे यश असेल, अन्यथा अपयश पदरी आहेच.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-12-2022 at 00:02 IST

संबंधित बातम्या