निवृत्त ग्रुप कॅप्टन दिनकर देशपांडे यांचे आवाहन; लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपण मध्य भारतात राहत असल्याने युद्ध , छुपे युद्ध किंवा घुसखोरीच्या घटनांशी आपला थेट संबंध येत नाही. त्यामुळे सशस्त्र दलांविषयीचे आकर्षण येथे फारसे दिसत नाही, परंतु सरकारी नोकऱ्या कमी होत असल्याचा या काळात सशस्त्र दलासारखी नोकरीची उत्तम संधी नाही. त्यासाठी पालकांनी मुलांना प्रोत्साहन करायला हवे, असे आवाहन ग्रुप कॅप्टन दिनकर देशपांडे (निवृत्त) यांनी केले.

देशपांडे यांनी लोकसत्ता कार्यालयाला शुक्रवारी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी सशस्त्र दलातील करिअरची संधी, मध्य भारतील युवकांची मानसिकता, स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी युवकांचा पुढाकार आणि काश्मीर प्रश्न याबाबत आपली मते मांडली.

देशपांडे यांनी भारतीय वायुदलात ३० वर्षे सेवा दिली. निवृत्तीनंतर त्यांनी एनडीए आणि सीडीएसच्या तयारीसाठी मार्गदर्शन सुरू केले. व्यक्तिमत्त्व विकासातील महत्त्वाचे घटक असलेले नेतृत्वगुण विकसित करणे आणि इंग्रजीतून बोलण्याच्या तयारीत त्यांचा भर असतो. शारीरिक क्षमता निर्माण करण्यासाठी ते प्रहार संस्थेकडे मुलांना पाठवतात. त्यांच्या मार्गदर्शन अनेक युवकांनी सशस्त्र दलात जाण्याचा मार्ग पत्कारला. त्यांचे स्वत:ची दोन्ही मुले  सशस्त्र दलात आहेत.  देशपांडे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर महाराष्ट्राने युद्ध बघितले नाही. सीमावर्ती भागातील लोकांना विशेषत: पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवरी राज्यातील नागरिकांना युद्ध, छुपे  युद्ध आणि दहशतवाद्यांची घुसखोरी यामुळे लष्कराचे महत्त्व आणि त्यातील करिअरची संधी यांची जाण आहे. विदर्भासारख्या मध्य भारतातील भूभागात त्याविषयी फारसी जागरूकता नाही. यासाठी संरक्षण मंत्रालयाने विदर्भात जनजागृतीसाठी उपक्रम हाती घ्यायला हवे. सोबतच पालकांनी मुलांमध्ये सशस्त्र दलाविषयीची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न करायला हवा, असे आवाहन त्यांनी केले.

आयटी क्षेत्राच्या बरोबरीचे वेतन

देशात सरकारी नोकऱ्या सातत्याने कमी होत आहे. शिवाय सशस्त्र दलातील वेतन आता आयटी क्षेत्रातील पॅकेजच्या बरोबरीचे झाले आहे.  वैद्यकीय सेवा आणि दलातील कर्मचाऱ्यांची काळजी सरकार घेते. तसेच सशस्त्र दलातील व्यक्तीला समाजिक प्रतिष्ठा आहे. प्रत्येक युवकाने एकादा तरी त्यासाठी प्रयत्न करायला हवे. या क्षेत्रात युवकांना करिअरसोबत मैदानी खेळ खेळायला मिळातात. मी स्वत: विदर्भ क्रिकेट संघाचा कर्णधार होतो आणि त्यातूनच वायुदलात निवड झाली, असेही देशपांडे यांनी सांगितले.

दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत

पाकिस्तानसोबतच्या दोन्ही युद्धावेळी वायुदलात सेवारत असलेल्या देशपांडे यांनी गुप्तवार्ता विभागात काम केले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार, स्थानिकांच्या मदतशिवाय दहशतवाद्यांचा निभाव लागू शकत नाही. काश्मीरचा प्रश्न अधिक जटिल होण्याचे ते एक कारण आहे. दहशतवादामुळे काश्मीरमधील सफरचंद आणि पर्यटनाचा व्यवसाय पार लयाला गेला आहे, याकडेही देशपांडे यांनी लक्ष वेधले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta interview with dinkar deshpande
First published on: 11-08-2018 at 02:06 IST