अकोला : श्रावण महिन्याला विशेष महत्व आहे. या महिन्यांमध्ये शिवालय भाविकांच्या गर्दीने फुलून जातात.सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले असते. हिंदी भाषिकांच्या श्रावण महिन्याची अगोदरच सुरुवात होते. हिंदी भाषिक द्वितीय श्रावण सोमवारनिमित्त वाशीम येथील प्रसिद्ध प्रभू पदमेश्वर संस्थान येथे प्रभू पदमेश्वराची चलनी नोटांनी अत्यंत आकर्षक सजावट करण्यात आली. त्यासाठी तब्बल पाच लाख ५१ हजार रुपयांच्या नोटांचा वापर करण्यात आला आहे.
चलनी नोटांची ही नेत्रदिपक सजावट भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. चलनी नोटांच्या सजावटीची चित्रफीत समाज माध्यमातून चांगलीच प्रसारित झाली आहे. श्रावण महिना हा अत्यंत पवित्र काळ आहे. जो प्रामुख्याने भगवान शिवाला समर्पित आहे.
या महिन्याला ‘सणांचा राजा’ असेही संबोधले जाते. कारण यात अनेक धार्मिक विधी, उपवास आणि सण साजरे केले जातात. भक्त या महिन्यात सोमवार आणि इतर दिवशी उपवास, पूजाअर्चा, मंत्रजप आणि ध्यान करून महादेवाची आराधना करतात. हिंदी भाषिकांच्या श्रावण महिन्याला गुरूपौर्णिमेपासूनच प्रारंभ झाला आहे. त्यामुळे शिवशंकराच्या मंदिरामध्ये भाविकांची चांगलीच गर्दी होताना दिसून येते. वाशीम शहरातील पदमेश्वर संस्थान प्रभू पदमेश्वराचे अत्यंत प्रसिद्ध शिवमंदिर आहे. या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची नेहमीच मांदियाळी असते.
या संस्थांमध्ये प्रभू पदमेश्वराची दर श्रावण सोमवारी वेगवेगळ्या पद्धतीने आकर्षक सजावट केली जाते. ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून जोपासली जात आहे. या श्रावण सोमवारी केलेल्या सजावटीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हिंदी भाषिक द्वितीय श्रावण सोमवारनिमित्त पदमेश्वर संस्थान येथे जिल्ह्यात प्रथमच चलनी नोटांचा वापर करून प्रभू पदमेश्वराची सजावट करण्यात आली. यामध्ये १०, २०, ५०, १००, २०० व ५०० रुपयांच्या कोऱ्या करकरीत चलनी नोटांचा वापर करण्यात आला.
पाच लाख ५१ हजार रुपयांच्या नोटांमधून ही सजावट मूर्त रूपात आली. चलनी नोटांद्वारे केलेल्या आकर्षक सजावटीची वाशीम जिल्ह्यासह राज्यात सर्वत्र चर्चा रंगली आहे. वाशीम जिल्ह्यात प्रथमच चलनी नोटाद्वारे आकर्षक सजावट करण्यात आल्याने ती पाहण्यासाठी परिसरातील असंख्य भाविकांनी मंदिरात प्रचंड गर्दी केली होती. आगामी काळात देखील श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी विविध प्रकारे आकर्षक सजावट केली जाणार असल्याची माहिती संस्थांच्यावतीने देण्यात आली. चलनी नोटांद्वारे केलेली सजावट सध्या चांगलीच चर्चेत आहे.