नागपूर मेट्रो रेल्वे व्यवस्थापनाकडून मिहानमध्ये त्यांच्या डेपोजवळ ‘मेट्रो इको पार्क’ उभारण्याची योजना आहे. मेट्रोच्या इतर प्रकल्पांप्रमाणेही हा पार्क भव्य स्वरूपाचा राहणार असून नागपूरकरांसाठी तो आकर्षणाचे केंद्र ठरेल, असा विश्वास व्यवस्थापनाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहराच्या विविध भागात नागपूर मेट्रो रेल्वेचे काम गतीने सुरू आहे. पहिल्या टप्प्यात म्हणजे खापरी ते नागपूर विमानतळ या जमिनीवरून धावणाऱ्या मेट्रोचे काम अंतिम टप्प्यात असून पुढील महिन्याच्या अखेपर्यंत या मार्गावरून चाचणी सुरू करण्याचा व्यवस्थापनाचा प्रयत्न आहे. मार्ग उभारणीसोबतच स्थानकांचे बांधकाम, पबल उभारणी आणि इतरही कामे  हाती घेण्यात आली आहेत. मेट्रो व्यवस्थापनाने हाती घेतलेला इकोपार्क हा आणखी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. मिहानमध्ये मेट्रोचा देखभाल दुरुस्ती प्रकल्प होणार असून त्याचे काम सुरू झाले आहे. तेथील अतिरिक्त जागेवर इको पार्कची उभारणी केली जाणार आहे. ३७,८७९ चौरस फूट क्षेत्रावर खासगी भागीदारीतून त्याचे बांधकाम करण्यात येणार आहे. या पार्कचे वैशिष्टय़ म्हणजे येथे करमणूक झोन, अ‍ॅग्रो टुरिझम झोन, इकोलॉजीकल झोन, अर्बन फॉरेस्ट झोन, बटरफ्लाय झोन, क्लब हाऊस आणि मार्केट झोनचीही व्यवस्था असणार आहे.

सीताबर्डीवरील जंक्शन आणि झिरोमाईल स्थानकाची इमारत हे मेट्रो बांधकामातील प्रमुख वैशिष्टय़ ठरणार आहे. झिरोमाईल चौकात हेरिटेज वॉक तयार करण्याचा प्रस्ताव आहे. या शिवाय अंबाझारी स्थानक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याची योजना आहे. छत्रपती चौक ते चिंचभवन या दरम्यान बांधण्यात येणारा चौरपदरी उड्डाण पूल सुद्धा नागपूर शहराच्या सौंदर्यात भर घालणार आहे. शहरातील प्रमुख चौकात मेट्रोच्या खांबावर तयार करण्यात येणारे व्हर्टिकल गार्डन सध्या सर्वाचे लक्ष वेधून घेत आहे. या पाश्र्वभूमीवर मिहानमध्ये होऊ घातलेला इको पार्क औत्सुक्याचा विषय ठरला आहे.

मेट्रो रेल्वे कामठीपर्यंत नेणार ; गडकरी यांचे आश्वासन

नागपूर : मेट्रो रेल्वे कामठीपर्यंत नेली जाईल, असे आश्वासन केंद्रीय भूपृष्ठवाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी दिले. कामठीत २,७०० कोटींच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.

भांडेवाडी येथे कचऱ्यापासून वीजनिर्मिती करणाऱ्या प्रकल्पासाठी कामठीतील कचरा तेथे नेले जाईल. कामठी २ भाजीबाजार, मटन मार्केट, मत्स मार्केट कामठी पालिकेने उभी करावी, सार्वजनिक वाहतुकीसाठी इथेनॉलवर चालणारी बस, इलेक्ट्रिकवर चालणारी रिक्षा, ई-ऑटोचे युग आता आहे. पेट्रोल, डिझेलचा वापर कमी करा.एकाही गरीबाच्या घरी स्वयंपाकासाठी लाकूड, कोळसा आणि रॉकेलचा वापर केला जाणार नाही, अशी स्थिती निर्माण करा, असे गडकरी म्हणाले.

गरिबांसाठी पंतप्रधान आवास योजनेतून पहिल्या टप्यातील १० हजार घरांचे काम सुरू झाले आहे, असे सांगून गडकरी यांनी  मेट्रो रेल्वे कामठीपर्यंत आणण्यासाठी आराखडा तयार करा, त्यासाठी आपण सर्वतोपरी मदत करू, असे त्यांनी सांगितले. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, येथील वीज वाहिन्या भूमिगत करण्यासह येथे १,२०० कोटींचा रिंगरोड होत आहे. शासनाकडून २५० कोटींची विविध कामे सुरू झाली असून नागपूरच्या जवळीस सगळ्या सुंदर शहर म्हणूण कामठीचा विकास करायचा आहे. याप्रसंगी खासदार कृपाल तुमाने, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निशा सावरकर, माजी राज्यमंत्री अ‍ॅड. सुलेखाताई कुंभारे यांचीही भाषणे झालीत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahametro to develop an eco park near mihan depo
First published on: 22-05-2017 at 03:57 IST