महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात यवतमाळ जिल्ह्याने ‘हॅटट्रिक’ची नोंद केली. दिग्रस विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून सलग पाचव्यांदा निवडून आलेले संजय राठोड, राळेगाव विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून तिसऱ्यांदा निवडून आलेले प्रा. डॉ. अशोक उईके आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे पुसद विधानसभा मतदारसंघाचे युवा आमदार इंद्रनील नाईक यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याने जिल्ह्यात आनंद व्यक्त होत आहे. विदर्भात सर्वाधिक तीन मंत्रिपदे यवतमाळ जिल्ह्यास मिळाली आहेत.

संजय राठोड चौथ्यांदा मंत्रिपदी

दिग्रस मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार राठोड यांची चौथ्यांदा मंत्रिपदी निवड झाली आहे. त्यांनी या मतदारसंघातून पाचव्यांदा विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला असून त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील हा मोठा टप्पा आहे. राठोड यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत यापूर्वी महसूल राज्यमंत्री, वनमंत्री, अन्न व औषध प्रशासन मंत्री, आणि मृदा व जलसंधारण मंत्री म्हणून कार्य केले आहे. त्यांची मंत्रिपदी निवड अपेक्षितच होती. राजकारणात दीर्घ काळ सक्रिय असलेल्या राठोड यांनी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांची चौथ्यांदा मंत्रिपदी निवड होणे, हे त्यांच्या राजकीय क्षमतेचे, बंजारा समाजाचे नेतृत्व म्हणून आणि लोकांशी असलेल्या दृढ संबंधांचे द्योतक मानले जात आहे.

हेही वाचा >>> पूर्व विदर्भातील चार जिल्हे मंत्रीपदापासून वंचित राहणार

भाजपकडून आदिवासी समाजाला न्याय

राळेगाव मतदारसंघातून तिसऱ्यांदा विजयी झालेले उईके यापूर्वी २०१४ मध्ये युती सरकारमध्ये तीन महिने आदिवासी विकास मंत्री होते. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे प्रा. वसंत पूरके यांचा दोन हजार ८०० च्या वर मतांनी पराभव केला. संघ परिवार आणि भाजपमध्ये वरिष्ठांशी त्यांचे घनिष्ट संबंध आहे. मंत्रिमंडळात त्यांना संधी देवून भाजपने आदिवासी समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जाते.

हेही वाचा >>> सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळात स्थान नाही, भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर

१० वर्षांनंतर पुसदच्या नाईक कुटुंबीयास मंत्रिमंडळात स्थान

पुसद विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)चे युवा आमदार इंद्रनील नाईक यांनी मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्याचे माजी मंत्री मनोहरराव नाईक यांचे ते चिरंजीव आहेत, तर राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांचे नातू असून ते पुसद विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. यावेळी ते ९० हजारांच्या वर मताधिक्याने निवडून आले आहेत. राज्याच्या स्थापनेपासून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांची सत्ता असताना नाईक कुटुंबीयांकडे कायम मंत्रिपदे राहिली आहेत. २०१४ नंतर तब्बल १० वर्षांनी पुसदच्या नाईक कुटुंबीयास मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खातेवाटपाकडे लक्ष

दिग्रस आणि पुसद हे दोन्ही बंजाराबहुल मतदारसंघ आहेत. दोन्ही मतदारसंघ एकमेकास लागून आहेत. दोन्ही मतदारसंघास राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने बंजारा समाजात आनंद व्यक्त होत आहे. जिल्ह्यातून तीन आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागल्याने, आता कोणाच्या वाट्याला कोणते खाते येते आणि पालकमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, याकडे राजकीय वर्तुळाचे आणि जनतेचे लक्ष लागले आहे.