कुठलेही भाष्य करण्यापूर्वी ही यादी एकदा नजरेखालून घाला. माजी मंत्री मारोतराव कोवासेंचे पुत्र विश्वजीत, खासदार कल्याण काळेंचे बंधू रवींद्र, अकोल्याचे अझहर हुसेन यांचे पुत्र झिशान, मधुकरराव चौधरींचे नातू धनंजय शिरीष चौधरी, माजी आमदार मधुकरराव ठाकूर यांच्या स्नुषा श्रद्धा, माजी मंत्री विलास मुत्तेमवारांचे पुत्र विशाल, केंद्रीय कार्यकारिणीत असलेले संजय दत्त यांचे बंधू ब्रिजकिशोर, जयंत ससाणेंचा मुलगा करण, बाबुराव तिडकेंचे पुत्र प्रसन्ना, विकास ठाकरेंचे पुत्र केतन, नितीन राऊतांचा मुलगा कुणाल हा सारा कौटुंबिक गोतावळा जमा झाला आहे तो नुकत्याच जाहीर झालेल्या काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीत. ३७५ जणांच्या या कार्यकारिणीत वर उल्लेखलेली नावे केवळ वानगीदाखल दिलेली. दुर्बीण लावून शोध घेतला तर आणखी बरीच सापडतील. या अशा सग्यासोयऱ्यांच्या भरवशावर काँग्रेस भाजपशी सामना करायला निघाली आहे. याच्याइतका हास्यास्पद प्रकार दुसरा असूच शकत नाही. आक्षेप या नेत्यांच्या नातेवाईकांवर नाहीच. यातल्या अनेकांमध्ये नेतृत्वगुण असतीलही. आक्षेप आहे तो सध्याच्या प्रतिकूल स्थितीत कोणती पावले उचलावी व कोणती नाही यावर. या पक्षाच्या विरोधात उभा ठाकलेला भाजप केवळ सत्ताच नाही तर त्यासाठी आवश्यक असलेले प्रत्येक क्षेत्र पादाक्रांत करत असताना आपण काय केले पाहिजे याचे भान पराभवाची अकरा वर्षे लोटूनसुद्धा काँग्रेसला आलेले नाही. हर्षवर्धन सपकाळांसारखा लढवय्या, अभ्यासू, दमदार अध्यक्ष नेमल्यावर त्याच्या मदतीला हा कुटुंबकबिला देण्याची अवदसा केवळ याच पक्षाला आठवू शकते.
पद द्यायचे पण कामच करू द्यायचे नाही हा या पक्षाचा स्थायिभाव. सत्तेत असताना तो खपून गेला. आता ते शक्य नाही. याचे भान या पक्षाला अजून आलेले दिसत नाही. समोरचा भाजप पक्षनिष्ठेला कमालीचे महत्त्व देणारा. काँग्रेस अजूनही व्यक्तिनिष्ठेतच अडकलेली. ही यादी त्याचीच खात्री पटवते. केवळ नेत्यांना खूश करण्यासाठी या यादीत अनेक गणंगांचा भरणा केला गेलाय. पक्षाची स्थिती नाजूक असल्याने गेल्या निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्यांना पुन्हा पक्षात घेणे हे मान्य पण त्यांना थेट कार्यकारिणीत स्थान देणे योग्य कसे ठरू शकते? वणीचे संजय खाडे, काटोलचे याज्ञवल्क्य जिचकार. मग हाच न्याय नरेंद्र जिचकारांना का नाही तर त्यांच्या नावाला विकास ठाकरेंचा विरोध आहे म्हणून. समजा हे जिचकार भाजपचे हस्तक असतील तर मग काटोलातून बंडखोरी करणाऱ्या याज्ञवल्क्य जिचकारांना भाजपची फूस नव्हती तर काय होते? पुसद पालिकेत सातत्याने दहा ते बारा नगरसेवक निवडून आणणारे डॉ. नदीम याच कार्यकारिणीत सचिव तर त्यांना विरोध करणारे आरीफ बेग थेट उपाध्यक्ष. यामागचे तर्कट नेमके काय? या साऱ्या कुटुंबकबिल्याच्या नावावर पक्ष खरोखर वाढणार आहे का? आधीच सामान्य जनतेला घराणेशाहीचा तिटकारा आलेला. नेमका त्याचाच फायदा घेत भाजपने नवनवे चेहरे रिंगणात उतरवण्याचे सत्र आरंभलेले. भाजपत सामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळते असे वातावरण यातून तयार झालेले. त्याला टक्कर द्यायची असेल तर नव्या चेहऱ्यांना संधी देणे हाच उपाय. शेंबडे पोरही हेच सांगेल. तेही काँग्रेसला कळत नसेल का? या नेत्यांच्या गणगोतामागे लोक उभे राहतील. नवे कार्यकर्ते जुळतील हा भ्रम. त्यातच हा पक्ष आकंठ बुडालेला. पराभव माणसाला बरेच काही शिकवून जातो असे म्हणतात. या पक्षातले नेते त्याला अपवाद ठरावे असेच. याच कार्यकारिणीत जी राजकीय व्यवहार समिती आहे त्यात झाडून सारे पराभूत. सर्व खचलेल्या मानसिकतेचे. ‘बडा घर पोकळ वासा’ असलेले. त्यांच्या बळावर या पक्षाला यश मिळणे शक्य आहे काय?
याच यादीत मुकुल वासनिक, अविनाश पांडे, रजनी पाटील अशी ठेवणीतली नावे आहेत. हे म्हणे दिल्लीतील पक्षाचे राजकारण सांभाळतात. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचा विदर्भ वा राज्याशी संपर्क तुटलेला. आजची नवीन पिढी वा मतदार यांना ओळखतसुद्धा नाही. असे नेते पक्षाला खरेच ऊर्जितावस्था मिळवून देणार काय? प्रत्येक निवडणूक आली की मर्जीतली माणसे रिंगणात उतरवण्यासाठी प्रयत्न (की कुरापती) करणे हेच यांचे काम. पक्षामुळे आपण आहोत हे वास्तवच हे नेते विसरून गेलेले. मी म्हणजे पक्ष या मानसिकतेत वावरणारे. अशांच्या बळावर पक्षाला यश कसे मिळणार? राजकारणात नवे प्रयोग करायला धाडस लागते. भाजपने आधीपासून यात सातत्य राखलेले. मात्र इतकी निचांकी कामगिरी नोंदवूनही काँग्रेस हे धाडस दाखवायला तयार नाही. निवडणूक आली की तेच तेच चेहरे रिंगणात उतरवायचे व पायावर धोंडा मारून घ्यायचा असाच या पक्षाचा प्रवास राहिलेला. शिवाजीराव मोघे चार निवडणुकीत पराभूत झाले. त्यांचे पुत्रही हरले. तरीही त्यांना अनुसूचित जमाती सेलचे राष्ट्रीय अध्यक्षपद. आता ते काढले असले तरी आधी देण्यात नक्की कोणता शहाणपणा होता? तीच गोष्ट वसंत पुरकेंची. लोकांनी आपल्याला नाकारले याची जाणीवच या नेत्यांना होत नसावी काय? आता हेच पुरके याच सेलचे राज्याध्यक्ष. माणिकराव ठाकरेंचीही अवस्था तशीच. त्यांचाही मुलगा आता कार्यकारिणीत. लोकांना हे चेहरे नकोसे झालेले हे या पक्षाच्या लक्षात कसे येत नाही? याच नेत्यांच्या बळावर काँग्रेसने लोकसभेत यश मिळवले असा दावा कुणी करू शकतो. मात्र त्यात तथ्य नाही. जनमत सरकारच्या विरुद्ध गेले होते. त्याला काँग्रेसने राष्ट्रीय पातळीवरून आखलेल्या प्रचारनीतीची जोड मिळाली म्हणून हे यश. या नेत्यांचा त्यात खारीचाही वाटा नाही हेच सत्य. नाही म्हणायला विधानसभेच्या वेळी काँग्रेसने काही प्रयोग केले. संजय मेश्राम (उमरेड), मसराम (आरमोरी), मांगूळकर (यवतमाळ), साजिद पठाण (अकोला), हेमंत ओगले (नगर), ज्योती गायकवाड (धारावी) ही यातली काही नावे. त्यांना बरोबर यश मिळाले. नव्या कार्यकर्त्यांना संधी देणे, त्यांच्यावर विश्वास टाकणे, मुख्य म्हणजे त्यांच्याच माध्यमातून सामान्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांना वाचा फोडणे, सातत्याने लोकांमध्ये मिसळणे याची अंमलबजावणी जोवर कठोरपणे केली जात नाही तोवर या पक्षाला सर्वंकष यश मिळणे शक्य नाही. या अशा पराभुतांचा भरणा असलेल्या कार्यकारिणीच्या माध्यमातून राज्यात अनुकूल वातावरणनिर्मिती होऊ शकेल असे स्वप्न जर हा पक्ष बघत असेल तर तो शुद्ध वेडेपणा. सध्या पक्ष कुणालाच काही देऊ शकत नाही. नाही म्हणून घ्या साऱ्यांना कार्यकारिणीत, हा प्रकारच पराभूत मानसिकता दर्शवणारा आहे. इतक्या मोठ्या कार्यकारिणीत ध्येय, धोरणे व रणनीती तसेच डावपेच आखण्यावर चर्चा तरी कशी होईल असा साधा प्रश्नही या पक्षाच्या धुरिणांना पडत नसेल का? कुणाचाच पायपोस कुणात नाही अशीच या पक्षाची स्थिती झाली आहे. एकट्या राहुल गांधींनी मेहनत घ्यायची व बाकीच्यांनी टाळ्या वाजवायच्या असेच काँग्रेसचे स्वरूप झाले आहे.