बुलढाणा : माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील उपराजधानी परिसरात करण्यात आलेले चक्का जाम आंदोलन विविध कारणांनी गाजले, वाद, टीका आणि शेवटी न्यायलयीन हस्तक्षेपापर्यंत पोहोचले. यानंतर राज्य सरकार सोबत झालेली चर्चादेखील गाजली. आंदोलक लढ्यात जिंकले, पण तहात हरले, अशी टोकाची टीकाही झाली. मात्र, कर्जमाफीसाठी ३० जून २०२६ ची मुदत मिळाली आहे.

या पार्श्वभूमीवर या बहुचर्चित आंदोलनात व मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या वाटाघाटीत सहभागी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी बुलढाण्यात परंतल्यावर आतील गोटातील माहिती देत काही खळबळजनक गौप्यस्फोटदेखील केले.

मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथी गृहावरील बैठकीत अधूनमधून खडाजंगी झाली. बैठक तोडग्यापूर्वीच संपण्याची वेळ आली. मात्र, अखेर चर्चा झाली, असे रविकांत तुपकर म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिडचिड केली नाही, पण तुम्ही मला ‘डिटेक्ट करू नका, माझा निर्णय मला घेऊ द्या, असे त्यांनी शिष्टमंडळाला बजावल्याचे तुपकर यांनी सांगितले.

प्रत्येक आंदोलन १०० टक्के यशस्वी होतेच असे नाही. मात्र या आंदोलनामुळे कर्जमाफीची डेडलाईन मिळाली ही उपलब्धी आहे. या आंदोलनामुळे १०० टक्के यश मिळाले नसल्याची कबुली रविकांत तुपकर यांनी दिली. तसाही शेतकरी नेत्यांचा भाजपा सरकारवर विश्वास नाही, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुदत दिल्याने त्यांच्यावर मुदतीचे दडपण आहे. त्यांना शब्द पाळावा लागेल हे निश्चित, असे रविकांत तुपकर यांनी स्पष्ट केले.

या आंदोलनात सर्व शेतकरी नेत्यांची कॉमन मिनिमम प्रोग्रामवर एकजुटता दिसली आणि आगामी काळात ती टिकून राहील, असा विश्वासही रविकांत तुपकर यांनी व्यक्त केला. आगामी काळात शेतकऱ्यांसाठी संपूर्ण राज्यात एक मोठे आंदोलन आम्ही उभे करणार आहोत. ज्यामुळे सरकारच्या बुडाला आग लागेल. ‘मंत्र्यांना कापा’ या माझ्या वक्तव्याचा सह्याद्री अतिथी गृहावरील बैठकीत विषय निघाला, त्यावेळेस सरकारमधील लोक मला म्हणायचे, तुम्ही जर मंत्री झाले तर तुम्ही कुणाला कापाल? आमदार, मंत्र्यांना कापा या वक्तव्याचा मला अजिबात पश्चाताप नाही, मी अजूनही या वक्तव्यावर ठाम आहे. जर सरकारने शेतकऱ्यांसाठी काही केले नाही, तर नक्कीच आगामी काळात तसे घडू शकते, असा सूचक इशारा रविकांत तुपकर यांनी चर्चेअंती दिला आहे.