अकोला : बारावीप्रमाणे इयत्ता दहावीच्या परीक्षा निकालात देखील अकोला जिल्ह्याची घसरणच झाली. अकोला जिल्ह्याचा ८९.३५ टक्के निकाल लागला असून अमरावती विभागात जिल्हा तळाशीच आहे. या निकालावरही मुलींचा वरचष्मा कायम आहे. ९३.८९ टक्के मुली, तर ८५.२४ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. दहावीच्या परीक्षेसाठी अकोला जिल्ह्यातून २५ हजार ४४९ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी २५ हजार २२९ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यातील २२ हजार ५४४ म्हणजेच ८९.३५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. १३ हजार २४७ मुले, तर ११ हजार ९८२ मुलींनी दहावीची परीक्षा दिली होती.
त्यातील ११ हजार २९३ मुले आणि ११ हजार २५२ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८५.२४, तर ९३.८९ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. अकोला जिल्ह्यात सर्वाधिक ९५.४७ टक्के निकाल पातूर तालुक्याचा लागला. अकोला तालुक्याचा ९०.५४, अकोट ८६.४४, तेल्हारा ८७.०८, बार्शीटाकळी ९०.३५, बाळापूर ८६.९५ व मूर्तिजापूर ८८,१२ टक्के निकाल लागला आहे.
५६२८ विद्यार्थी प्रावीण्यासह उत्तीर्ण
अकोला जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेत पाच हजार ६२८ विद्यार्थी प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले. सहा हजार ६५९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, सात हजार ५३४ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, तर दोन हजार ७२३ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. बाल शिवाजी शाळेचा १०० टक्के निकाल बाल शिवाजी माध्यमिक शाळेचा १०० टक्के निकाल लागला. एकूण ८७ पैकी ८० विद्यार्थ्यांनी प्रावीण्य प्राप्त केले.
५७ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण आहेत. पयोष्णी विक्रम घाईट हिने १०० टक्के गुण मिळवत शाळेतून प्रथम आली आहे. ईश्वरी गणेश डांगे ९९.८० टक्के द्वितीय तर, परिमल दीपक ठाकरे याने ९८.६० टक्के गुण मिळवून शाळेतून तृतीय क्रमांक पटकावला. संस्कृत विषयात २१ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण, गणित विषयात पाच विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण, विज्ञान विषयात दोन, समाजशास्त्र, इंग्रजी व मराठी विषयात प्रत्येकी एका विद्यार्थ्याने पैकीच्या पैकी गुण प्राप्त केले आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापनाने कौतुक केले.