नागपूर : करोनामध्ये आर्थिक कोंडीत सापडल्यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) नवीन बसेसची खरेदी केली नाही. जुन्या बसेस ‘स्क्रॅप’मध्ये निघाल्याने बसेसची संख्या कमी झाली. परंतु, त्यानंतरही राज्यात एसटी बसचे अपघात व मृत्यूही वाढले. माहिती अधिकारातून हा तपशील समोर आला आहे. एसटीच्या ताफ्यात ३१ मार्च २०२० रोजी १८ हजार १६१ प्रवासी बसेस होत्या. नंतर सुमारे २ हजार बसेस ‘स्क्रॅप’मध्ये काढण्यात आल्या. त्यामुळे बसेसची संख्या आणखी खाली आली.

राज्यात १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ दरम्यान एसटीच्या ३ हजार १४ अपघातात २ हजार ४५० प्रवासी गंभीर जखमी तर ३४३ प्रवाशांचा मृत्यू झाला. १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ दरम्यान ३ हजार ३८१ बसेसच्या अपघातात २ हजार ८१८ प्रवासी गंभीर जखमी तर ४२१ जणांचा मृत्यू झाला. १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ दरम्यान ३ हजार ५६३ बसेसच्या अपघातात ३ हजार २३४ प्रवासी गंभीर जखमी तर ४७० प्रवाशांचा मृत्यू झाला. सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहिती अधिकारातून हा सर्व तपशील समोर आणला.

करोना काळात आर्थिक कोंडी

एसटी महामंडळाची करोना काळात चांगलीच आर्थिक कोंडी झाली होती. राज्यात करोनाचा शिरकाव झाल्यावर टाळेबंदी लागली. सगळेच नागरिक घरात सुरक्षीत असतांना विविध राज्यातील मजूर राज्यात अडकून पडले होते. यावेळी एसटीतून परराज्यातील नागरिकांची संबंधित राज्यांच्या सिमेवर सोडण्याची सोय केली गेली. या काळात विविध वैद्यकीय साहित्यांची वाहतूकीसह इतरही अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या एसटी महामंडळाकडे दिल्या गेल्या होत्या. काही शहरात रुग्णांची वाहतूक, मृतदेहांची वाहतूकही एसटीच्या बसमधून करण्यात आल्या होत्या.

अपघाताची स्थिती

कालावधीअपघातगंभीर जखमीमृत्यू
१- ०४- २२ ते ३१- ०३- २३३०१४२४५०३४३
१- ०४- २३ ते ३१- ०३- २४३३८१२८१८४२१
१- ०४- २४ ते ३१- ०३- २५३५६३३२३४४७०

एसटीच्या मार्गस्थ बिघाडाची स्थिती

कालावधीबिघाड
१- ०४- २२ ते ३१- ०३- २३६४३३५
१- ०४- २३ ते ३१- ०३- २४६७०१९
१- ०४- २४ ते ३१- ०३- २५६६५५२