नागपूर: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) उत्पन्न वाढीसाठी आता प्रवाशांसोबत सौजन्याने वागणुकीवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यानुसार एसटी बसच्या चालक- वाहकांनी मार्गातील सर्व नियोजित थांब्यांवर बस थांबवावी, प्रवाशांशी सौजन्याने वागावे, असे निर्देश दिले आहेत. १ मार्च ते ३१ मार्च २०२४ दरम्यान या उपक्रमावर विशेष लक्ष दिले जाणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २८ फेब्रुवारीला विधानभवनात महामंडळाच्या विषयावर बैठक घेतली. यावेळी एसटीचे उत्पन्न वाढीसाठी कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेत बदल करण्याकरिता अधिकाऱ्यांनी बस चालक- वाहकांसह इतर कर्मचाऱ्यांच्या समस्या वेळेवर सोडवणे व चालक- वाहकांसह कर्मचाऱ्यांनी प्रवाशांशी सौजन्याने वागून महामंडळाची आर्थिक तुट भरण्याच्या सूचना देण्यात आल्या.
हेही वाचा >>>“सोबत घेऊन ठेचून काढण्याचा भाजपचा अनुभव येतोय,” बच्चू कडू यांची टीका; म्हणाले, “चलती आहे तोपर्यंत…”
१ मार्च ते ३१ मार्च दरम्यान एसटीत सौजन्य महिना राबवला जाणार आहे. ज्येष्ठ नागरिक, अपंगांना अग्रक्रमाने प्रवेश, चढ- उतारास मदत, योग्य तिकीट देणे, फलाटावर बस लावल्यानंतर प्रवाशांना आरक्षित आसनांची माहिती देणे, योग्य मार्गफलक लावणे, बस स्वच्छ ठेवणे, नियंत्रण कक्षातील वाहतूक नियंत्रकांनी प्रवाशांच्या चौकशीला योग्य उत्तर देण्याची सूचना करण्यात आली आहे. आगार व्यवस्थापक- विभागातील सर्व अधिकारी यांनी त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांचे प्रश्न उदा: बढती, नियमानुसार बदली, सेवाविनिमय विषयक प्रश्न, वार्षिक वेतनवाढम्) प्रामुख्याने सोडवावे, असेही कळवण्यात आले आहे.
प्रवाशांशी सौजन्यपूर्ण वागणुकीतून महामंडळाच्या उत्पन्न वाढीसाठी १ मार्च ते ३१ मार्चदरम्यान महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्या सूचनेनुसार काम केले जाईल. त्यात प्रवासी व कर्मचाऱ्यांशी संबंधित सर्व गोष्टींवर विशेष लक्ष दिले जाईल.’’- श्रीकांत गभणे, उपमहाव्यवस्थापक, एसटी महामंडळ, नागपूर</p>