नागपूर: भारत हे अखंड आणि हिंदू राष्ट्रच असल्याचा मोठा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी दिल्ली येथे झालेल्या व्याख्यानमालेत केला. त्यांच्या या वक्तव्याने देशात हिंदू राष्ट्राची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. या मुद्दावर अनेक गट-तट आहे. अर्थात गेल्या दहा वर्षांत हिंदू राष्ट्राची चर्चा होत आहे. यावर महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सरसंघचालकांना आता वानप्रस्थाश्रमाला जायला हवे असा सल्ला दिला. काय आहे हे प्रकरण पाहूया.

समाजात शांती आणि सद्भाव वाढावा यासाठी समविचारी पक्षाच्या वतीने २९ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’ आयोजित करण्यात आली आहे. यासंदर्भात तुषार गांधी यांनी प्रेस क्लबमधील पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गांधीवादी संघटना शहरी नक्षलवादी असल्याचा ठपका ठेवला होता. परंतु, गांधीवादी हे क्रांतीकारी आहेत. हेच क्रांतीकारी सत्तेत असणाऱ्यांची झोप उडवतात. त्यामुळे फडणवीसांना आमचा राग येणे स्वाभाविक आहे. तसेच ते स्वत: ज्या विचारधारेतून येतात त्यांना गांधी विचारांची कायम भीती असते. त्यामुळे त्यांच्या आरोपांचा नवल नाही. आम्ही क्रांतीकारी आहोत पण बंदूकधारी नाही, अशा शब्दात महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

काय म्हणाले होते मोहन भागवत?

भारत हा अखंड आहे. हेच जीवनाचे तथ्य आहे. आपले पूर्वज, संस्कृती आणि मातृभूमी हा आपल्या एकजुटतेचा दूवा आहे. अखंड भारत ही राजनीती नाही. हे सार्वजनिक मत आहे. भारत हा अखंड आहे आणि ते हिंदू राष्ट्र आहे ही भावना ज्यावेळी जागृत होईल त्यावेळी सर्वच सुखी होतील. येथे शांतता नांदेल. भारत हे हिंदू राष्ट्रच आहे. मग ते जाहीर करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट मत सरसंघचालकांनी या व्याख्यानमालेत मांडले. ऋषी आणि मुनींनी, संतांनी, विभूतींनी हे हिंदू राष्ट्र असल्याचे अगोदरच घोषित केलेले आहे. त्यासाठी कोणतीही अधिकृत घोषणा करण्याची काय गरज आहे. हे तर ढळढळीत सत्य आहे. हे मानले तर तुमचा लाभ आहे आणि तुम्ही नाही मानलं तरी काही नुकसान नाही, असे सरसंघचालक म्हणाले.

तुषार गांधी नेमके काय म्हणाले?

पत्रकार परिषदेमध्ये तुषार गांधी यांना प्रश्न विचारण्यात आले. यात मोहन भागवत यांनी भारत हे हिंदू राष्ट्रच आहे असे सांगितले. यावर गांधींना काय वाटते असे विचारले असता त्यांनी भागवत अलिकडे काहीही वक्तव्य करत असून त्यांना आता वानप्रस्थाश्रमाकडे जाण्याची वेळ आली, अशी मिस्कील टिप्पणी केली.