खासगी रुग्णालये रुग्णांकडून उकळताहेत पैसे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गोरगरिबांना आजारपणात आर्थिक आधार देता यावा, या उदात्त हेतूने शासनाने सुरू केलेल्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतही रुग्णांची लूट सुरूच आहे. संबंधित विमा कंपनीने रुग्णालयांना रुग्णांच्या उपचाराचा पूर्ण खर्च दिल्यावरही काही रुग्णालये रुग्णांच्या नातेवाईकांकडून निमबाह्य़ पैसे उकळत असल्याच्या तक्रारी येत आहेत.

या योजनेंतर्गत उपराजधानीत शासकीय व खासगी मिळून ३५ रुग्णालयांची नोंदणी करण्यात आली. या सर्व रुग्णालयांमध्ये १ जुलै २०१७ ते आजपर्यंत सुमारे २७ हजार  रुग्णांवर विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया व औषधोपचार केले गेले. या रुग्णालयांना उपचाराच्या बदल्यात नॅशनल इन्शोरन्स या विमा कंपनीकडून ५४ कोटीहून जास्तची रक्कम अदा केली गेली. विमा कंपनीकडून उपचाराचे पूर्ण देयक मिळत असल्याने रुग्णालयांना नातेवाईकांकडून एकही रुपया घेता येत नाही, परंतु काही रुग्णालयांनी हा नियम धाब्यावर बसवत विविध तपासणीसह इतर अतिरिक्त खर्चाच्या नावावर नातेवाईकांकडून लक्षावधी रुपयांची अवैध वसुली केल्याच्या तक्रारी या योजनेच्या कार्यालयांना प्राप्त झाल्या आहेत. दरम्यान, काही रुग्णालयांच्या तपासणीत रुग्णांच्या उपचाराचे बनावट कागदपत्रेही आढळली तर काही रुग्णालयांमध्ये रुग्णांवर या योजनेअंतर्गत  उपचारासाठी मनाई केल्याचेही निदर्शनात आले आहे. अशा वेगवेगळ्या कारणांमुळे गेल्या सहा महिन्यात शहरातील सुमारे पाच रुग्णालयांना या योजनेतून कायमस्वरूपी बडतर्फ तर दोन रुग्णालयांना ठरावीक कालावधीसाठी निलंबित केल्याची माहिती आहे.  काही रुग्णांच्या नातेवाईकांनी तर त्यांच्याकडून रुग्णालय  प्रशासनाने उपचाराचे कोणतेही शुल्क घेतले नसल्याचे जबरन लेखी लिहून घेतल्याचे सांगितले. रुग्ण डॉक्टरांच्या ताब्यात असल्याने असे लिहून देण्याशिवाय पर्याय नव्हता, असेही त्यांचे म्हणणे आहे.

तक्रार करा, कारवाई करू

ही योजना गरीब व मध्यमवर्गीय रुग्णांसाठी वरदान आहे. गेल्या वर्षभरात शहरात २७ हजार रुग्णांवर या योजनेअंतर्गत नि:शुल्क शस्त्रक्रिया व औषधोपचार केले गेले. काही रुग्णालयांबाबत तक्रारीनंतर त्यांच्यावर कारवाई केली गेली. नातेवाईकांना या योजनेशी संबंधित काही तक्रार असल्यास १८००२३३२२०० किंवा १५५३८८ या क्रमांकावर संपर्क साधावा. तातडीने चौकशी करून रुग्णांना न्याय मिळवून दिला जाईल. एकाही रुग्णांना त्रास होऊ नये ही शासनाची भावना आहे.   – डॉ. संजय जयस्वाल, आरोग्य उपसंचालक, नागपूर.

लुबाडणूक अशी होते

रुग्ण उपचारासाठी दाखल झाल्यावर त्याच्या विविध तपासणीचे शुल्क संबंधित रुग्णालयाकडून आकारले जाते. जीवनदायी योजनेत हे प्रकरण मंजूर झाल्यावर हे पैसे या रुग्णालयांनी नातेवाईकांना नियमानुसार परत करणे आवश्यक आहे, परंतु ते केले जात नाही. हृदयाच्या स्टेनसह इतर साहित्याचे प्रत्यारोपण करताना योजनेत मिळणारे साहित्य निकृष्ट असल्याचे सांगत नातेवाईकांकडून चांगल्या प्रतीचे साहित्य प्रत्यारोपित करण्यासाठी रक्कम घेतली जाते. उपचारासाठी जास्त खर्च आल्याचे सांगत रुग्णालये नातेवाईकांकडून रक्कम उकळतात. अनेक प्रकरणात रक्कम घेतल्यावर रुग्णालयांकडून नातेवाईकांना पैसे घेतल्याची रसिद दिली जात नसल्याच्याही नातेवाईकांच्या तक्रारी आहेत.

योजनेतून बाद झालेली रुग्णालये

  • श्रीकृष्ण हृदयालय
  • क्रिसेन्ट रुग्णालय
  • मेडिट्रिना रुग्णालय
  • केशव रुग्णालय
  • शतायू रुग्णालय
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahatma jyotiba phule jan arogya yojana
First published on: 11-07-2018 at 01:13 IST